जगाची भाषा (?) आणि आपण (ले० सुधन्वा बेंडाळे)

प्रिय स्वाभिमानी मराठी बांधवांनो,

जगाची भाषा इंग्रजी असल्यामुळे आपण इंग्रजी शिकलो नाही तर जगातच नव्हे तर देशात, राज्यातही आजच्या स्पर्धायुगात मागे पडू अशी आपल्याला भीती असते. पण इंग्रजी खरोखरच संपूर्ण जगाची भाषा आहे का?

श्री० सुधन्वा बेंडाळे यांनी ’समर्थ मराठी संस्थे’च्या ’कोहिनूर’च्या २००७ सालच्या वार्षिक अंकात लिहिलेला लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे तो पहा.

अमृतमंथन-जगाची भाषा आणि आपण (ले० सुधन्वा बेंडाळे)

विविध संस्थांनी केलेल्या आपापल्या पाहणीनुसार आणि प्रत्येक भाषेत कुठल्या बोली भाषा समाविष्ट करतात यानुसार इंग्रजी भाषा जगात दुसरी, तिसरी किंवा चौथी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा समजली जाते. मात्र भाषक-संख्या हाच निकष लावायचा असल्यास एकच भाषा निर्वादितपणे ’जगाची भाषा’ ठरू शकते आणि ती म्हणजे चिनी (मॅंडॅरिन) हीच भाषा. पण ते कोणी मान्य करणार नाही.

इंग्रजी किंवा इतर भाषा आवश्यकतेप्रमाणे जरूर शिकाव्या, त्यांवर प्रभुत्वही मिळवावे. पण ते ज्ञान लवकरात लवकर मातृभाषेत आणावे. म्हणजे इतर बहुजनांना त्याचा फायदा होईल. मातृभाषेतील शिक्षणाला पर्यायच असू शकत नाही हे जगभरातील विद्वान व भाषातज्ञ सांगतात. भारतातील अनेक तज्ञांनीही आतापर्यंत तेच सांगितले. हल्लीच्या ‘इंडिया’मधील made in USA असलेले तज्ज्ञ मात्र याला अपवाद आहेत.

साध्य आणि साधन या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. आपण त्यात गल्लत करता कामा नये. ज्ञान हे आपले साध्य असते आणि ते मिळवण्यासाठी भाषा हे साधन असते. ज्ञान हे इंग्रजी, जर्मन, जपानी, संस्कृत, बंगाली, हिंदी आणि आपली मातृभाषा अशा कुठल्याही भाषेत मिळवता येते. पण भारतात आपण “केवळ इंग्रजी भाषा म्हणजेच ज्ञान” अशी गल्लत करतो. इंग्रजी शिकलो नाही तर आपल्याला ज्ञान मिळवण्याची सुतराम शक्यता नाही असा आपण ग्रह करून घेतलेला आहे. खरं म्हणजे, आपल्या भारतीय भाषा सक्षम केल्या तर बहुजनसमाजाला आपण बरेचसे शिक्षण आपल्या भाषांमध्ये नक्कीच देऊ शकतो. आपल्या भाषा शासनव्यवस्था, संवादभाषा, माहितीभाषा या सर्वांसाठी आवश्यकतेप्रमाणे विकसित करू शकतो. स्वभाषेबद्दलचा न्यूनगंड निग्रहाने बाजुला सारून इंग्रजांनी आपली गावठी आणि असंस्कृत समजली भाषा समृद्ध करून इतक्या प्रगत आणि मानाच्या स्थानाला आणून ठेवली; इतरही अनेक राष्ट्रांनी आपापल्या भाषांची आधुनिक काळात प्रगती केली. तसे भारतीयांना का शक्य होणार नाही?

युरोप, आशिया, आफ्रिका, अमेरिका, अशा विविध खंडात असे अनेक प्रगत-अप्रगत देश आहेत की ज्यामध्ये इंग्रजी ही भाषा फारशी माहित नसते. जपानमध्ये शिक्षण, शासनव्यवस्था, उद्योगधंदे, संशोधन या पैकी कुठल्याही क्षेत्रात इंग्रजीला फारसे स्थान नाही. बेंडाळेंच्या प्रस्तुत लेखात सुचविल्याप्रमाणे जपानमध्ये मुख्यतः दुभाषेमंडळी परकीय भाषा शिकतात, कारण केवळ त्यांचाच व्यवसाय मुख्यत्वेकरून त्यांच्यावर अवलंबून आहे. जपानमध्ये इतर कोणाचेही अंतर्गत व्यवहारात इंग्रजीवाचून अडत नाही. उलट जपानशी व्यवहार-उद्योग करायचा तर इतर देशांना त्यांच्या भाषेत संपर्क साधायला लागतो. जपानी भाषेत नसणार्‍या संस्थळांकडे जपानमधील जनता फारसे लक्षच देत नाही. जपानमधील उच्चशिक्षणच नव्हे तर संशोधनही इंग्रजीच्या कुबड्यांशिवाय चालते. जपानमधील ज्या तज्ज्ञांनी नोबेल पारितोषके मिळवली त्यांनी आपले संशोधन आपल्या भाषेतच केले !

तसेच इस्रायलचे उदाहरण घेऊ. त्या देशाला भारतानंतर ९ महिन्यांनी स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी हिब्रू भाषा ही जवळजवळ मृतवत्‌ झालेली भाषा होती. ज्यू लोक जगभर विखुरलेले होते आणि त्यांनी त्या-त्या ठिकाणची स्थानिक भाषा तसेच संस्कृतीसुद्धा आपलीशी केली होती. महाराष्ट्रातही बरेच ज्यू (बेणे इस्रायली) होते. कोकणातील रायगड (पूर्वीचा कुलाबा) जिल्हा इथे बर्‍याच ज्यूं लोकांची वस्ती होती. चौलकर, पेणकर, रेवदणकर अशी त्यांची गावावरून आडनावे होती. त्यांची संस्कृती, रूढी, रीतिरिवाज, हे सर्व मराठी संस्कृतीत पूर्णतः मिसळलेले होते. मराठी हीच त्यांची मातृभाषा होती. अशा प्रकारे जगभरचे ज्यू इस्रायलच्या निर्मितीनंतर एकत्र आले; पण त्यातील अनेकांना हिब्रू भाषेची तोंडओळखही नव्हती. हिब्रूची शब्दसंख्याही फार मर्यादित होती. स्पष्ट शब्दांत सांगायचं तर भाषेची प्रगल्भता आणि संपन्नता या दोन्ही दृष्टींनी अत्यंत दुर्दैवी परिस्थिती असूनही स्वाभिमानपूर्वक इस्रायलमध्ये हिब्रू हीच देशाची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून तिची वेगाने एवढी प्रगती केली की त्या भाषेत शिक्षण घेऊन शिकलेल्या संशोधकांच्या द्वारा इस्रायलमध्ये भारतापेक्षा कितीतरी अधिक संशोधन चालते. संरक्षण सामुग्री, शेतकी तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी क्षेत्रात तो इवलासा देश भारतापेक्षा कितीतरी अधिक प्रगत आहे. जगातील दोन टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या असणार्‍या इस्रायली माणसांनी २० टक्क्यांहून अधिक नोबेल पारितोषके मिळवली आहेत!  इस्रायलने स्वभाषेच्या बाबतीत जे गेल्या ६० वर्षांत साध्य केले त्याच्या एक दशांशही आपण करू शकलो नाही हे वास्तव आहे.

ज्या-ज्या स्वाभिमानी देशांनी आपापल्या भाषा पुरेशा सक्षम केल्या त्या इंग्रजीतर देशांनी (जपान व इस्रायल सकट) विज्ञान, गणित अशा विषयांमध्ये भरपूर प्रगती केली. त्यातील अनेक देशांनी विज्ञान, गणितातील संशोधनासाठी नोबेल पारितोषके (बहुधा इंग्रजी भाषक देशांपेक्षा अधिक) मिळवली आहेत. आपण मात्र आमच्या भाषा या ज्ञानभाषा, उच्चशिक्षणभाषा, संवादभाषा होऊच शकत नाही असा गळा काढून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो व उंदरांसारखे पुंगीवाल्या इंग्रजीच्या मागे लागतो. त्याचा परिणाम एवढाच की सर्व क्षेत्रांत लायकी असूनही आपण इतर स्वकर्तृत्ववान देशांच्या मागेच राहतो. म्हणून शेवटी भारतीय वंशाच्या व्यक्तीने परदेशात केलेल्या शिक्षणाच्या आणि संशोधनाच्या बळावर नोबेल पारितोषक मिळवले की “तो माणूस मूळचा भारतीय वंशाचाच आहे” असे म्हणून आपलीच पाठ थोपटून घेतो. तसं म्हटलं तर डार्विनच्या उत्क्रांतिवादाप्रमाणे आपण सर्वच अमिबापासून जन्माला आलेले आहोत. म्हणजे सर्व मूळ एकाच वंशाचे. मग “नोबेल पारितोषक मिळवणारा प्रत्येकच माझ्या वंशातला” असे म्हणून आपण स्वतःची पाठ थोपटून घ्यायलाही काहीच हरकत नाही.

इंग्रजी माध्यमातील शिक्षणाबद्दल महात्मा गांधींनी दूरदृष्टीने काढलेले उद्गार आठवतात.

“The foreign medium has caused a brain fag, put an undue strain upon the nerves of our children, and made them crammers and imitators, unfitted them for original work and thought and disabled them from filtrating learning to the family or masses.” (Young India, 1-9-1921)

“परकीय माध्यमामुळे बालकांच्या मेंदूला थकवा येतो. त्यामुळे त्यांच्या मज्जासंस्थेवर अनाठायी ताण येऊन ती फक्त घोकंपट्टी करू लागली आहेत. परिणामी मूलभूत आणि स्वतंत्र संशोधन व विचारांकरता ती अपात्र बनली आहेत. त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या कुटुंबाला अथवा बहुजनसमाजाला उपयोग होत नाही.”

या उद्गारांत गांधीजींनी भारताच्या भाषिक यशापयशाची कुंडलीच मांडली होती असे म्हणावे लागेल. गांधीजींच्या या भविष्यवाणीचा प्रत्यय आपल्याला पावलोपावली येत आहे; पण तरीही आपण त्याच्या मूलभूत कारणांचा विचारच करीत नाही. ऍलोपॅथीमधील काही अयोग्य औषधांच्या दीर्घकालीन वापराने त्याचा दुष्परिणाम (side effects) वाढत जातो व दुखणे कमी करण्याचा चांगला परिणाम कमी होत जातो. पण तसे झाल्यावर ते औषध बंद करून दुसरे योग्य औषध देण्याऐवजी बर्‍याचदा डॉक्टर त्याच औषधाची मात्रा वाढवीत जातो. त्यामुळे दुखणे बरे न होता उलट इतर अपाय अधिकाधिक होतात; तसाच आपला भाषा धोरणाचा प्रयोग आहे.

बेंडाळेंच्या लेखातील जपानी अधिकार्‍यांचे “जगाची भाषा? कोणत्या जगाची भाषा? आणि ती जगाची भाषा असेल तर आमचा जपान देश त्या जगात नाही !!” हे बाणेदार उद्गार जपानी माणसाच्या खर्‍या अर्थाने स्व-तंत्र व स्वावलंबी असण्याचे द्योतक आहेत.

याच अमृतमंथन अनुदिनीमधील ’इंग्रजी भाषेचा विजय’ हा लेख आपण वाचला का? इंग्रजांनी आपल्या भाषेबद्दलचा न्यूनगंड दूर सारून फ्रेंच भाषेची मानसिक अधिसत्ता झुगारून दिली नसती तर नंतरच्या काळात जगभर जिंकलेल्या प्रदेशांमध्ये व इंग्रजांच्या वसाहतींमध्ये (अमेरिका, ऑस्ट्रेलियासह) ते फ्रेंच भाषेचाच प्रसार करीत राहिले असते आणि आज फ्रेंच भाषा ही सध्याच्या इंग्रजी भाषेहूनही अधिक बलाढ्य झाली असती;ही गोष्ट आपण नाकारू शकतो का?

थोडक्यात सांगायचे म्हणजे ’भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ या म्हणीप्रमाणे ’न्यूनगंडग्रस्तापुढे अनंत समस्यांचा राक्षस’ आणि ’कणखर स्वाभिमान्यापुढे यशाच्या पायघड्या’ असेच भाष्य भारतीयांच्या भाषाधोरणाच्या बाबतीत करावे लागेल.

अशाच प्रकारचे याच अमृतमंथन अनुदिनीवरील ’जगाची भाषा आणि आपण’ (ले० सुधन्वा बेंडाळे) या लेखावरील परीक्षणही अवश्य वाचा.

वरील लेखाबद्दलचे आपले प्रतिमत (feedback) लेखाखाली लिहून अवश्य कळवा.

– अमृतयात्री

.

Tags: ,,

.

11 thoughts on “जगाची भाषा (?) आणि आपण (ले० सुधन्वा बेंडाळे)

 1. Namaskar,

  Uttam lekh ahe. Mi suddha kama nimitta Europe maddhe gelo ahe (Finland, Norway, Germeny, Czech Republic). ani tithe english konihi bolat nahi. Navin alele shabh (words) te tyanchya sathi bhashantarit kartaat. pan te tyanchi bhasha ajibaat sodat nahit. ani ase asunahi te kuthehi kami nahit. navhe te kitiari pudharalele desh ahet.
  Bharatat pan kititari thikani ase chitra ahe.
  Maharashtratach ase ka hote he matra umagat nahi.

  • प्रिय श्री० मंदार देशपांडे,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या उत्स्फूर्त प्रतिमताबद्दल (feedback) अत्यंत आभारी आहोत. आपण युरोपीय देशांच्या स्वभाषाभिमानाबद्दल नोंद केलेली माहिती अतिशय योग्यच आहे. पण आपण डोळे आणि कान उघडे ठेऊन प्रवास केला तरच अशी माहिती दिसते, आणि लक्षात येते. नाहीतर दिसूनही ती लक्षात येत नाही.

   जागतिकीकरणाच्या नावाखाली अशा कुठल्याही देशाने स्वभाषा आणि स्वसंस्कृतीबद्दलचा अभिमान बाजुला केलेला नाही. आणि त्यामुळे त्यांचा काहीही तोटा झालेला नाही. उलट स्वभाषा सक्षम करून त्यांत शिक्षण देणारे देशच संशोधन, विज्ञानात अग्रेसर दिसतात.

   आपल्या माहितीबद्दल खरोखरच धन्यवाद.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 2. Priya Amrityatri gat,
  Kshama kara! Devnagrit lihinyachi iccha asunahi lihita yet nahi. Aso.
  Me Europat rahto aani Hindi shikawato. Me mul Punyacha- Shuddha Marathi manus ahe. Parantu mala suruwatipasunach sahityachi , natkachi awad aslyaane me Marathi, Hindi, English aani nantar German aani sadhya Polish madhe pushkal wachan karto. Bhashekade pahnyacha maza drushtikon ajibatach political nahi. Mala watte, ki jewha niyam aani kayde yetat aani rajkaran yete tewha bhashesarkhya najuk goshtichi farach galchepi hote aani aapan nakki bhashewar prem karto ki nahi ase watu lagte. Jagat anant bhasha ahet-aani jar tya stri sarkhya ahet ase manle tar mala ekhadi stri awadu shakte aani ekhadi naahi, pan mulatunach ekhadi stri awadne yacha artha STRITWA-tichyatle female element baddal akarshan ahe- je arthaatach jagbharatil sarwa striyant ahe. Yat rajkaran aannyacha sawal yet nahi. Ulat anek bhashanchya vyasangane tumhi swata samruddha hotach, parantu tumchya matrubhashela dekhil adhik kahi denyachya shakyata wadhtaat. Aani konala kontya bhashebaddal prem awad nirmaan hoil he ghatna /rajkarni tharwu shakat naahit. Mulaat aapan aaplya bhashecha abhimaan balagtana itar bhashan war prem karnyachya shakyata dekhil khluya thewayla hawyaat. Mardhekaranni mhanlyapramane Sahitya he mansachya sanvedana/anubhav adhik samruddha karnyasathi ahe, tar kityek lekhak tyala anandanche, anandachya abhivyaktiche sadhan mantaat. Maza swatacha jo thodaafar anubhav ahe tyawarun me sangu shakto ki anek bhashantil sahitya/natya/kala shi halu halu nate jodat gelo tar aaplyala nawi nawi dare khuli hotat, kadhi na disleli ek antargat veen disu shakte. Aani mhanun me swata asha bhashechya aju bajula politicla goshti wachun far dukhi hoto.
  Aapan karit aslela ha vichar-manthan prapanch farach uttam ahe. To chalu thewawa. Aaplya sarwanche hardik aabhar aani shubheccha.

  Kalawe,
  Mandar Purandare

  • प्रिय श्री० मंदार पुरंदरे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभार.

   आपले म्हणणे कुठल्याही दृष्टीने अयोग्य वाटत नाही. ’हिंदी राष्ट्रभाषा? एक चकवा !’ या लेखामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे मातृभाषेबद्दल प्रेम, आदर, सन्मान बाळगण्यासाठी इतर भाषांचा तिरस्कार करण्याची आवश्यकताच नाही. तिथे तसे स्पष्टच लिहिले आहे. त्या लेखातील खालील परिच्छेद वाचून पहा.
   {ज्याप्रमाणे भारताबद्दल अभिमान बाळगणे याचा अर्थ पाकिस्तानी, बांगलादेशी किंवा अमेरिकी लोकांचा द्वेष करणे असा होत नाही; …………………………… शिक्षणभाषा, ज्ञानभाषा, माहितीभाषा अशा विविध दृष्टीकोनातून तिचा सतत विकास साधायलाच पाहिजे. फ्रेंच व लॅटिन भाषांच्या दबावाखाली पिचणार्‍या आणि हिणकस व गावठी समजली जाणार्‍या इंग्रजी भाषेला इंग्रजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी आपला न्यूनगंड झटकून ह्याच मार्गाने उत्कर्षाकडे नेले.}

   {Jagat anant bhasha ahet-aani jar tya stri sarkhya ahet ase manle tar mala ekhadi stri awadu shakte aani ekhadi naahi, pan mulatunach ekhadi stri awadne yacha artha STRITWA-tichyatle female element baddal akarshan ahe- je arthaatach jagbharatil sarwa striyant ahe.}
   आपल्याला अनेक इतर-परक्या स्त्रियांबद्दल आदर, कौतुक, आकर्षण इत्यादी भावना असू शकतात. पण एक स्त्री वगळता इतरांना पत्नीचे-अर्धांगीचे विशेषस्थान मिळू शकत नाही (निदान मिळता कामा नये).

   त्याचप्रमाणे माता-मातृभूमी-मातृभाषा यांना अनन्यसाधारण विशेष स्थान असते.

   आभार.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 3. १) मला असं वाटत नाही कि इग्रजी ही जगाची भाषा आहे.
  २) त्याच बरोबर जगातील जास्तीतजास्त देशांमध्ये इंग्रजी भाषे मध्ये देवाण घेवाण होते. हे सत्य आपण नाकारू शकत नाही. उदाहरणार्थ: जर आपण वेगवेगळ्या शैक्षणिक संशोधन प्रसिद्धीची नियतकालिके (Journals पाहिलीत तर त्यांची जास्त संख्या इंग्रजी मध्येच आहे. युरोपिअन देशात त्यांच्या त्यांच्या भाषां मधील नियतकालिके आहेत.
  ३) मग भारतीय भाषां मध्ये तशी नियत कालिके का नाहीत? त्याचा एक कारण म्हणजे आपलं पूर्वीचा सगळं ज्ञान हे संस्कृत मध्ये होते. विविध आक्रमण मुले तसेच स्वतान्त्र्यानानात्र संस्कृत भाषेला (सर्वधर्म वाद्यांनी तसेच निधर्मी वाद्यांनी) वाळीत टाकले. सध्याची जी मराठी आहे त्या मध्ये फारसे जागतिक दर्जाचे विज्ञान आणि गणित या सारख्या क्षेत्रांत संशोधन नाही.
  ४) सध्याची अत्यंत उपयुक्त तसेच जास्त पैसे मिळवून देणारी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान. ते सुद्धा मुळात इंग्रजी भाषकांनी तयार केले. सध्या आपल्या कडे फक्त त्याचे अनुकरण चालू आहे. मूलभूत संशोधनाची सध्यातरी आपल्या देशात वानवाच आहे.

  हे सगळा रडगाणे नसून ही सध्याची खरी परिस्थिती आहे. आपल्या लोकांना मातृभाषा पण धड पाने येत नाही आणि परकीय भाषा पण नाही. हे सगळे मधेच कुठे तरी धेडगुजरी भाषा बोलतात. हीच खरी शोकांतिका आहे. ही सगळी स्थिती मुख्यतः राजकारण आणि आरक्षण या मुळे आहे.

  • प्रिय अपर्णा लालिंगकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या प्रतिमताबद्दल आभारी आहोत.

   आपल्या विधानांच्याबद्दलची आमची मते त्या विधानांखाली दिली आहेत. आपण काढलेले निष्कर्ष खरे मानण्यासाठी त्यामागचे पुरावे व आकडेवारी जाणून घ्यायला आवडेल. एवढ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर केवळ ऐकीव माहितीवर आधारून आपण बनवलेली मते हे तर्कशुद्ध निष्कर्ष होऊ शकत नाहीत. हिंदी भाषेबद्दलच्या मताचा चक्काचूर झाल्यावर अनेकांना धक्का बसला आणि मन ते सत्य मानायला तयार होईना कारण राष्ट्रभाषेबद्दलचे असत्य लहानपणापासून खरे म्हणूनच गृहित धरले होते व ते पुरावे पाहिल्याशिवायच वादातीत सत्य मानले होते.

   १) मला असं वाटत नाही कि इग्रजी ही जगाची भाषा आहे.
   अ०ग०)) आपले विधान योग्यच आहे. पण आपले पुढील वाक्य त्याच्याशी सुसंगत आहे की नाही ते कळत नाही.

   २) त्याच बरोबर जगातील जास्तीतजास्त देशांमध्ये इंग्रजी भाषे मध्ये देवाण घेवाण होते. हे सत्य आपण नाकारू शकत नाही. उदाहरणार्थ: जर आपण वेगवेगळ्या शैक्षणिक संशोधन प्रसिद्धीची नियतकालिके (Journals पाहिलीत तर त्यांची जास्त संख्या इंग्रजी मध्येच आहे. युरोपिअन देशात त्यांच्या त्यांच्या भाषां मधील नियतकालिके आहेत.
   अ०ग०)) आपण जगातील नियतकालिकांचा अभ्यास केला असल्यास इंग्रजी व इंग्रजीतर कालिकांची आकडेवारी काय आहे ती सांगावी. जाणून घ्यायला आवडेल. इंग्रजी-इंग्रजीतर नोबेल पारितोषक विजेत्यांची आकडेवारीही पहावी. कदाचित धक्कादायक ठरू शकते.

   ३) मग भारतीय भाषां मध्ये तशी नियत कालिके का नाहीत? त्याचा एक कारण म्हणजे आपलं पूर्वीचा सगळं ज्ञान हे संस्कृत मध्ये होते. विविध आक्रमण मुले तसेच स्वतान्त्र्यानानात्र संस्कृत भाषेला (सर्वधर्म वाद्यांनी तसेच निधर्मी वाद्यांनी) वाळीत टाकले. सध्याची जी मराठी आहे त्या मध्ये फारसे जागतिक दर्जाचे विज्ञान आणि गणित या सारख्या क्षेत्रांत संशोधन नाही.
   अ०ग०)) याची कारणे जपान, इस्रायल व अशा अनेक देशांनी स्वतःच्या उदाहरणांवरून दिलेली आहेत. परभाषेतून शिक्षण घेतलेली पिढी मूलभूत संशोधन करू शकणार नाही याचा इशारा महात्मा गांधी व अनेक भाषातज्ज्ञांनी स्वातंत्र्यानंतर दिला होता. युरोपात इंग्रजी बोलणारे देश फारसे नाहीतच. पण त्या देशांनी जागतिकीकरणाच्या नावाखाली भारताप्रमाणे स्वतःच्या भाषेला बाजुला सारून शिक्षणव्यवस्था, न्यायदान, शासनव्यवस्था, समाजव्यवहार, इत्यादींसाठी इंग्रजी भाषा स्वीकारलेली नाही; पण तरीही युरोपातील बहुतेक सर्वच देशांचे राहणीमान भारतापेक्षा खूपच वरच्या दर्जाचे आहे. भारताने मराठीच का कुठल्याही भाषेत मूलभूत संशोधन तर सोडाच; साधे इतर भाषातील उच्चशिक्षणाचे ज्ञानही आणले नाही. जगात स्वभाषेत शिक्षण व राज्यकारभार चालवणारी राज्येच स्वबळावर पुढे येतात, आपल्यासारखी स्वातंत्र्यानंररही गुलामगिरीचे आयुष्य काढणारी नव्हेत.

   ४) सध्याची अत्यंत उपयुक्त तसेच जास्त पैसे मिळवून देणारी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान. ते सुद्धा मुळात इंग्रजी भाषकांनी तयार केले. सध्या आपल्या कडे फक्त त्याचे अनुकरण चालू आहे. मूलभूत संशोधनाची सध्यातरी आपल्या देशात वानवाच आहे.
   अ०ग०)) अशा गोष्टी गृहित धरण्याआधी त्यासंबंधी आकडेवारी जमवावी. संरक्षणासारख्या विध्वंसक संशोधनावर अमेरिका किती पैसा खर्च करते याची कल्पना नाही. जगात अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड हेच देश मुख्यतः इंग्रजी भाषक आहेत. त्यांच्याशिवाय इतर देश फारसे संशोधन करीतच नाहीत असे आपले म्हणणे असेल तर त्याबद्दलची आकडेवारी जाणून घ्यायला आवडेल.

   ५) हे सगळा रडगाणे नसून ही सध्याची खरी परिस्थिती आहे. आपल्या लोकांना मातृभाषा पण धड पाने येत नाही आणि परकीय भाषा पण नाही. हे सगळे मधेच कुठे तरी धेडगुजरी भाषा बोलतात. हीच खरी शोकांतिका आहे. ही सगळी स्थिती मुख्यतः राजकारण आणि आरक्षण या मुळे आहे.
   अ०ग०)) आपल्या शोकांतिकेच्या मागची कारणे भारत सोडून इतर कुठल्याही देशातील भाषातज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ सांगू शकेल. त्याचा आरक्षणाशी फारसा संबंध असेल असे आम्हाला तरी वाटत नाही. आपल्याला तसे वाटत असल्यास त्याबद्दलचे पुरावे सांगू शकलात तर बरे होईल. जगात स्वभाषेत शिक्षण व राज्यकारभार चालवणारी राज्येच स्वबळावर पुढे येतात, आपल्यासारखी स्वातंत्र्यानंररही गुलामगिरीचे आयुष्य काढणारी नव्हेत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s