एका नवीन उत्तम पुस्तकाबद्दल माहिती वाचल्यावर ती आपणा सर्वांपर्यंत पोचवावीशी वाटली म्हणूनच हा प्रपंच.
दैनिक सकाळ, बुधवार, २१ ऑक्टोबर २००९ मधील वृत्त:
साहित्य संघाचाही मराठीचा झेंडा – ‘मराठी बोलू कौतुके…‘
मुंबई मराठी साहित्य संघाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ज्ञानोबा-तुकोबांची ‘अमृताते पैजा जिंके’ म्हटल्या जाणार्या मराठी भाषेचे वैभव सांगणार्या एका देखण्या ग्रंथाची निर्मिती पूर्ण झाली आहे. ‘मराठी बोलू कौतुके…’
या ग्रंथात बाबासाहेब पुरंदरे (शिवाजी महाराजांच्या पत्रातील मराठी भाषा), डॉ. सदानंद मोरे (तुकारामाचे काव्य आणि मराठी भाषा), डॉ. मो. दि. पराडकर (पंडिती काव्याचे मराठीला योगदान), डॉ. रामचंद्र देखणे (लोककाव्य आणि मराठी भाषा) आणि डॉ. सिसिलिया कार्व्हालो (मराठी भाषक ख्रिस्ती लेखकांचे मराठीला योगदान) आदी लेखकांनी मराठीविषयीचे चिंतन केले आले आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांच्या अनेक पत्रांमधून नवनवीन शब्द मराठी भाषेला कसे मिळाले आणि भाषा समृद्ध कशी होत गेली ते सांगितले आहे.
संत तुकाराम हे शेतकरी असल्यामुळे शेतीविषयक सर्व व्यावहारिक शब्द, पर्यावरणीय संदर्भ त्यांच्या रचनेत दिसतात. तसेच ते व्यापारी असल्यामुळे सावकारीचे, रोजकीर्दीचे, हिशेबाचे, व्याजासंबंधीचे शब्द सहजपणे येतात. ‘व्यवहारा’च्या गोष्टी अनुभवाचा भाग झाल्यामुळे तुकोबांची शब्दसंपदा अतिशय समृद्ध झाल्याचे डॉ. सदानंद मोरे नमूद करतात.
डॉ. मो. दि. पराडकर यांच्या लेखात रामायण आणि महाभारत या महाकाव्यांनी जोपासलेला अभिजातवाद तोलून धरण्याचे कार्य पंडिती कवींनी केल्याचे तसेच पंडिती काव्यांनी शेकडो सुभाषिते मराठीला बहाल केल्याचा संदर्भ आला आहे.
लोककाव्याचे वेगळेपण सांगताना डॉ. रामचंद्र देखणे यांनी म्हटले आहे की, लोककाव्यांनी एक संस्कृती उभी केली आहे. संस्कृतीत जगण्यातील स्वाभाविकता लोककलाकारांनी मांडली म्हणूनच मराठी भाषेचे नितळ रूप लोककाव्यातून प्रगट झाले.
डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी परदेशातील ख्रिस्ती धर्माबरोबर आलेली संस्कृती आणि मराठी मातीतील संस्कृती या दोन संकरातून निर्माण झालेले ख्रिस्ती भाषकांचे मराठी साहित्य सांगितले आहे.
संघाचे अध्यक्ष ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर यांची मूळ संकल्पना असलेल्या या ग्रंथाचे संपादन अशोक बेंडखळे आणि उषा तांबे यांनी केले आहे तर पुस्तकाचे कलात्मक मुखपृष्ठ सतीश भावसार यांनी तयार केले आहे.
मराठी माणसेच मराठी बोलत नाहीत, मराठीचा उदो उदो करणारेच आपली मुले “कॉन्व्हेंण्ट’मध्ये शिकवायला पाठवितात, मराठीला मरगळ आली आहे, तिचे अस्तित्व धोक्यात आले आहे… अशा एक ना अनेक कारणांची जंत्री विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून सातत्याने दिली जाते. मात्र तिच्या संवर्धनाबद्दल ना राजकीय पक्षांना चिंता ना सरकारी यंत्रणेला आस्था. मराठीची ही राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक “स्थित्यंतरे’ साहित्य संघाने नेमकेपणाने हेरून मराठीची थोरवी, मराठीचा मधाळपणा तिच्या भाषीय श्रीमंतीचे प्रत्यंतर या ग्रंथात घडविले आहे. येत्या 24 ऑक्टोबर रोजी साहित्यिक प्रा. के. ज. पुरोहित, विजया मेहता, प्रभाकर देवधर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा ग्रंथ साहित्य संघात प्रकाशित होत आहे.
–०=O=०-