‘इंग्रजी भाषेचा विजय’ या लेखाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांबद्दल श्री० सलील कुळकर्णी यांनी केलेले विवेचन.
—————-
प्रिय मराठीप्रेमी मित्रांनो,
सप्रेम नमस्कार.
काही महिन्यांपूर्वी अटल बिहारी वाजपेयींनी लोकसभेत केलेल्या भाषणाबद्दलचा लेख मला पुण्यातील आमचे ज्येष्ठ सुहृद प्रा० राईलकर यांच्याकडून मिळाला. प्रा० राईलकर हे आमच्या दृष्टीने समर्थ रामदासांप्रमाणे ऋषितुल्य गुरू व मार्गदर्शकच आहेत. अशा व्यक्तींच्या संपर्कात राहण्यास मिळते हे माझे मोठेच भाग्य!
वाजपेयींच्या भाषणामध्ये इंग्रजांनी ६०० वर्षांच्या आपल्या भाषाविषयक न्यूनगंडावर व मानसिक दास्यत्वावर निश्चयाने कसा विजय मिळवला याबद्दलचा उल्लेख वाचला व माझे कुतुहल मला स्वस्थ बसू देईना. इंग्रजांची सतराव्या शतकातील मानसिक स्थिती व आपली आजची स्थिती यात मला अनेक बाबतीत विलक्षण साम्य वाटले व ह्याबद्दलची सर्व माहिती जमवून आपल्या मराठी बांधवांसमोर ठेवलीच पाहिजे असे मला प्रकर्षाने वाटू लागले.त्याबद्दलची माहिती महाजाल, वाजपेयींनी संदर्भित केलेले पुस्तक इत्यादी स्रोतांमधून मिळवली व मग प्रस्तुत लेख तयार केला.
आपल्या मायबोलीच्या हिताच्या दॄष्टीने हा लेख जास्तीत-जास्त मराठीप्रेमी बांधवांपर्यंत पोचवला पाहिजे यासाठी तो वर्तमानपत्रात प्रसिद्ध व्हावा असं मला वाटत होतं. पण ते कसं साध्य व्हावं? मी काही साहित्यिक नाही. नामांकित व्यक्ती तर मुळीच नाही. पण सुदैवाने लोकसत्तेच्या सौ० शुभदा पटवर्धनांनी या बाबतीत खूपच सहकार्य केले. त्यांचे आभार मानायलाच हवेत. रविवार लोकसत्तेच्या ०४ ऑक्टोबर २००९ तारखेच्या लोकमुद्रा पुरवणीत तो लेख प्रकाशित झाला. त्यानंतर हा लेख अमृतयात्री गटाने ’अमृतमंथन’ (https://amrutmanthan.wordpress.com/) या अनुदिनीवरही सर्वांच्या सोयीसाठी कायमचा उपलब्ध करून ठेवला याबद्दल त्यांचेही आभार.
लोकसत्तेत लेख प्रकाशित झालेल्या दिवसापासून वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया उत्स्फूर्त मिळाल्या. लोकसत्तेतील लेखाखाली माझा विरोप (ई-मेल) पत्ता दिलेला असल्यामुळे बरेच अभिप्राय विरोपाद्वारे मिळाले. शिवाय काही वाचकांनी अमृतमंथनावरही प्रतिक्रिया लिहिल्या होत्या. मला व्यक्तिशः ओळखणार्या काही व्यक्तींनी दूरध्वनी, एस०एम०एस० द्वारे सुद्धा प्रतिक्रिया कळवल्या. डॉ० गिरीश ओक (अभिनेता) यांचे वडिल श्री० रत्नाकर ओक यांनी तर माझा दूरध्वनी क्रमांक शोधून काढून संपर्क केला व आपला अभिप्राय सांगून बक्षिस म्हणून डॉ० ओकांच्या ’तो मी नव्हेच’ नाटकाच्या प्रयोगाची तिकिटे माझासाठी ठेवण्याचे प्रेमळ आश्वासन दिले.
बहुतेक वाचकांच्या प्रतिक्रिया पाठिंबादर्शक (पॉझिटिव्ह) होत्या. एखाद-दोघांनीच या लेखातील इंग्रजांची आपल्याशी तुलना व त्या अनुषंगाने व्यक्त केलेला आशावाद अमान्य असल्याचे कळवले. दोन-तीन जणांनी इंग्रजांप्रमाणे बाणेदारपणा आपल्याला दाखवता येईल की नाही याबद्दल शंका व्यक्त करून मराठीच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल तीव्र निराशा व्यक्त केली होती. पण बहुसंख्य वाचकांना लेख वाचून हुरूप आला व मायबोलीच्या पुनरुत्थानाविषयी आशा वाटू लागली. काहींनी तर तो आपल्या संस्थांच्या मासिकात किंवा पुस्तकात समाविष्ट करण्याची अनुमती मागितली.
मासल्यासाठी म्हणून काही निवडक वाचकांच्या प्रतिक्रिया व त्यांना मी लिहिलेली किंवा अमृतमंथनावर दिली गेलेली उत्तरे खालील दुव्यावर ठेवलेल्या तक्त्यामध्ये आढळतील.
प्रतिक्रिया-अमृतमंथन-इंग्रजी भाषेचा विजय_लोकसत्ता_ 041009
वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया, त्यांना पुन्हा वाटू लागलेला आशावाद, ही सर्व मराठीच्या दृष्टीने शुभ लक्षणे नक्कीच आहेत, पण पुढे काय? या सर्व हुरुपाचे, उमेदीचे, स्वाभिमानाचे काहीतरी विधायक व ठोस कृतीमधे रुपांतर कसे करायचे? तसे काही करणे जमले तरच या लेखाचे उद्दिष्ट सफळसंपूर्ण झाले असे म्हणता येईल.
म्हणून आपणा सर्वांना मी अशी कळकळीची विनंती करू इच्छितो की ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी कशी सफळसंपूर्ण करावी याबद्दल विचार करून कृपया आपल्या सूचना कळवाव्या. इंग्रजांप्रमाणे आपणही आपल्या मायबोलीला पुन्हा उर्जितावस्था आणून देऊन आपल्या मातेचे ऋण फेडू शकलो तर आपले आयुष्यच सार्थकी लागले असे म्हणता येईल.
यापुढेही विरोपाद्वारा (email) किंवा ’अमृतमंथन’ अनुदिनीद्वारा सतत एकमेकांच्या संपर्कात राहूया व या चळवळीला अधिकाधिक व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न करुया. अमृतमंथन अनुदिनीवर (अमृतयात्री गटाची संमती घेऊन) आपण एखादा चर्चागटही स्थापन करून विचारमंथन करू शकतो. आपले विचार अवश्य कळवा.
मोठ्या आशेने आपल्या पत्रांची वाट पाहत आहे.
आभार.
आपला भाषा-सहोदर,
सलील कुळकर्णी
हा लेख म्हणजे माझ्या वाचनात आलेला या वर्षीचा सर्वोत्कृष्ट लेख म्हणता येईल. इंग्रजांनी जसे कायदे केले तसे आपणही करायला हवेत व त्याची अंमल बजावणी सुद्धा करायला हवी. नाही तरी अजूनही लोक मुंबईला बॉंबेच म्हणतात. कायद्याचा अंकुश हवा.
[सदर उत्तर श्री० सलील कुळकर्णी (मूळ लेखाचे लेखक) यांनी लिहिले आहे.]
प्रिय श्री० अभिजित,
सप्रेम नमस्कार.
आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहे. खरं म्हणजे या लेखाच्या बाबतीत मी केवळ आचार्याचे व वाढप्याचे काम केलेले आहे. मूळ कच्चा माल व त्यापासून रुचकर पदार्थ बनवण्याची कृती ही माझी नाहीच. असो.
मराठीची सध्याची परिस्थिती पाहिल्यावर हा इतिहास मराठी माणसापुढे ठेवण्याची तीव्र इच्छाझाली व म्हणूनच हा लेख लोकसत्तेत व या अनुदिनीवर प्रकाशित करण्यास दिला. आपल्याला लेख आवडला तर तो अधिकाधिक मराठी मित्रांना दाखवा, अग्रेषित करा. ह्यातून आपल्या मायबोलीचे भले झाले तर आपले जीवन सार्थकी लागले असे म्हणता येईल. आपण सर्व समविचारी, समरुची मंडळींनी एकमेकांच्या संपर्कात रहायला पाहिजे आणि एकत्र येऊन काही करायला पाहिजे. याबद्दल आपले विचार नक्की कळवा.
{इंग्रजांनी जसे कायदे केले तसे आपणही करायला हवेत व त्याची अंमल बजावणी सुद्धा करायला हवी. नाही तरी अजूनही लोक मुंबईला बॉंबेच म्हणतात. कायद्याचा अंकुश हवा.}
लोकांवर कायद्याचा अंकुश असण्याआधी कायदे करणार्या लोकांवर सामान्य माणसाचा अंकुश हवा, तो नसल्यामुळेच तर ही परिस्थिती ओढवली आहे. इंग्रज सरकारने कायदे केले ते लोकांच्या दबावामुळेच. भारतातील इतर राज्यात राज्यभाषेचा मान ठेवला जातो तोसुद्धा स्वाभिमानी जनतेच्या दबावामुळेच. तसे आपण करू शकू काय?
अमृतमंथन अनुदिनीवरील ’हिंदी राष्ट्रभाषा’ आणि ’पन्हाळा: एक अनुभव’ हे दोन्ही लेख नक्की वाचा व आपल्या प्रतिक्रिया कळवा. ’३.१ मराठी अस्मिता’ या गटातील इतरही लेख वाचून आपल्याला कसे वाटले ते कळवा. आवडले तर इतरांना दाखवा. स्वाभिमानाची आग आपण सर्वत्र अधिकाधिक पसरवायलाच पाहिजे.
क०लो०अ०
हा लेख खरंच संग्रहणिय आहे. माझं मराठी पण तसं दिव्यच आहे. ह्र्स्व
दिर्घाची भरपुर चुका करतो मी, तरी पण लिहिण्याचा अट़्टाहास सोडत नाही.
“आपला हट़्ट न सोडता -विक्रमादित्य जसा प्रेताला पुन्हा पुन्हा
खांद्यावर घेउन” ( चांदोबामधल्या गोष्टी प्रमाणे) जाउ लागतो, तसंच माझं
मराठी लिखाणाचं आहे. कितिही चुका झाल्या तरिही , किंवा कितिही इंग्रजी
शब्द वापरले गेले ,तरिही मी मराठी लिहिणे कांही सोडत नाही.
.प्रत्येक मराठी भाषिकाने मराठी मधे काही ना काही तरी लिहिणे आवश्यक आहे. जर आपणच कम्फर्ट लेव्हल नाही म्हणुन मराठी मधे लिहिणे टाळलं तर कसं चालेल??आपणच आपली मराठी मधे लिखाणाची कम्फर्ट लेव्हल तयार करायला हवी , तरंच ही भाषा जगेल. !
मराठी चे शत्रू म्हणुन एक लेख माझ्या ब्लॉग वर पोस्ट केला होता, कांही
दिवसांपुर्वी. त्याची लिंक इथे दिलेली आहे. http://tinyurl.com/ykl4skq
मराठीचं जर पुनरुज्जिवन करायचं असेल तर आधी सगळ्या मराठी भाषिकांनी एकत्र येणं आवश्यक आहे. जर,आपल्या – आपल्यातच फुट पडली, तर कांहीच होणं शक्य नाही. मराठी लोकांच्यामधली एकी ही सध्या काळाची गरज आहे असे मला वाटते.पुन्हा एकदा अभिनंदन.. आणि पुढिल लिखाणासाठी शुभेच्छा..
महेंद्र
(सलील कुळकर्णींच्या वतीने)
प्रिय श्री० महेंद्र,
सप्रेम नमस्कार.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
{माझं मराठी पण तसं दिव्यच आहे. ह्र्स्व दिर्घाची भरपुर चुका करतो मी, तरी पण लिहिण्याचा अट़्टाहास सोडत नाही. “आपला हट़्ट न सोडता -विक्रमादित्य जसा प्रेताला पुन्हा पुन्हा खांद्यावर घेउन” ( चांदोबामधल्या गोष्टी प्रमाणे) जाउ लागतो, तसंच माझं मराठी लिखाणाचं आहे. कितिही चुका झाल्या तरिही , किंवा कितिही इंग्रजी शब्द वापरले गेले ,तरिही मी मराठी लिहिणे कांही सोडत नाही..}
माझ्या मते स्वभाषेबद्दल प्रेम, आपुलकी, अभिमान असणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. माझंही लिखाण पूर्णपणे अचूक असतं असा माझा गैरसमज नाहीच. पण मला असंही वाटतं की आपण चांगलं लिखाण वाचत राहिलो आणि जाणीवपूर्वक (consciously) चांगल्या प्रकारे बोलण्याचा-लिहिण्याचा प्रयत्न केला तर आपली भाषाही नक्कीच सुधारते. याबाबतीत एक दुर्दैवाची बाब अशी की आपण आपल्या इंग्रजीच्या ज्ञानाविषयी जितके दक्ष (alert) असतो तेवढे मराठीच्या बाबतीत नसतो. इंग्रजीला जेवढे वलय लाभले आहे तसे आपल्याला मराठीच्या बाबतीत जाणवत नाही. (अनेक मराठी माणसांना तर मराठीबद्दल प्रचंड न्यूनगंड असतो.) आपले इंग्रजी सुधारावे म्हणून आपण खूप प्रयत्न करतो, इंग्रजी लिहिताना शब्दकोशाचा उपयोग करतो. इंग्रजी बोलतानासुद्धा आपण खूप काळजी घेतो. आपल्या इंग्रजीच्या चुका झाल्यास आपल्याला अडाणी, अशिक्षित म्हणतील अशी आपल्याला भीती वाटत असते. पण मराठीच्या बाबतीत मात्र आपण बेपर्वाई दाखवतो. बर्याच वेळा घराबाहेर आपण मराठीत बोलणे टाळतो. शक्यतो इंग्रजी किंवा हिंदीत बोलतो. काही मंडळी नाईलाजाने मराठी बोलावे लागले तरी अडखळत, इंग्रजी-हिंदीची भरपूर भेसळ करून आपल्याला मराठी नीट येत नसल्याची बतावणी करतात.
{प्रत्येक मराठी भाषिकाने मराठी मधे काही ना काही तरी लिहिणे आवश्यक आहे. जर आपणच कम्फर्ट लेव्हल नाही म्हणुन मराठी मधे लिहिणे टाळलं तर कसं चालेल??आपणच आपली मराठी मधे लिखाणाची कम्फर्ट लेव्हल तयार करायला हवी , तरंच ही भाषा जगेल. !}
आपले म्हणणे १०० टक्के योग्य आहे. माझ्या मते स्पेलिंगे, उच्चार, व्याकरण इ० बाबतीत मराठीपेक्षाही इंग्रजी भाषा शिकण्यास फारच कठीण आहे. पण ती केवळ सरावाने आपण शिकतो, विनातक्रार. कारण त्यावाचून पर्यायच नसतो. मराठी शिकण्याच्या बाबतीत मात्र आपण “मराठी भाषा फार कठीण आहे, बोजड आहे”; असं सांगून टाळाटाळ करतो. मनापासून सराव केल्यावर इंग्रजी भाषा येते तर मराठी नक्कीच येईल. असो. (इथे मी ’आपण’ हा शब्द सामान्यार्थाने – in generic sense, वापरला आहे.)
माझ्या मर्यादा मी ओळखून आहे. त्यामुळे मी व्यक्तिशः खालील गोष्टींचा आळस न करता अवलंब करतो. (आपल्याला योग्य वाटल्यास आपणही प्रयत्न करून पहा.)
१. अवांतर वाचन करताना, लोकांशी चर्चा करताना, दूरदर्शनावरील कार्यक्रम पहाताना, विचार करताना कधीही एखादा चांगला शब्द ऐकला/सुचला की लगेच माझ्या व्यक्तिगत शब्दकोशात (त्याला मी शब्दवेध असे नाव दिले आहे) नोंदून टाकतो. (त्यासाठी मी excel sheet वापरतो. आज माझ्याकडे अशा सुमारे २-३००० इंग्रजी शब्दांना विविध मराठी पर्यायी शब्द उपलब्ध आहेत. (अनेक वेळा एका इंग्रजी शब्दाला त्याच्या प्रत्येक अर्थच्छटेला ५-१० पर्यायी शब्द असे एकूण ३०-४० मराठी पर्यायी शब्दसुद्धा नोंदले आहेत. त्यापैकी बरेच पर्यायी शब्द कुठल्याही एका पर्यायी शब्दकोशात सापडणार नाहीत.) (सूचना: आपल्याला योग्य मराठी शब्द सुचत नसल्यामुळे किंवा इं-म किंवा म-इं भाषांतरासाठी कधीही कसलीही मदत लागल्यास मला सांगावे. शक्य असल्यास मी आनंदाने मदत करीन.)
२. शब्दार्थाविषयी जराही शंका कंटाळा न करता ताबडतोब शब्दकोश पाहतो. आवश्यक वाटल्यास माझ्या शब्दवेधात नोंद करतो.
३. व्याकरण, शुद्धलेखनाविषयी शंका असल्यास शुद्धलेखनाचे पुस्तक लगेच पहावे. मराठीतील काही चांगली पुस्तके म्हणजे – मो० रा० वाळंबे यांचे व्याकरण प्रदीप व यस्मिन शेख यांचे राज्य शासनाचे पुस्तक (नाव लगेच आठवत नाही आहे).
आवडीच्या विषयाच्या बाबतीत चिकाटी व सराव हे सर्वात उत्तम गुण. ते शास्त्रीय गायन, क्रिकेट, लेखन, वक्तृत्व, अभिनय अशा कुठल्यही बाबतीत फायदेशीर ठरते. चर्चिल हा जगप्रसिद्ध वक्ता प्रथम अत्यंत सुमार वक्ता होता. उमेदवारीच्या काळात आरशापुढे उभाराहून त्याने भाषाचा प्रचंड सराव केला आणि मग तो जगातील सर्वोत्कृष्ट वक्त्यांपैकी एकझाला. पूर्णपणे वेगळ्या भाषा माहित असणारे पाश्चात्य संस्कृत, हिंदी, मराठी भाषांवर प्रभुत्त्व मिळवतात; मग आपल्याला ते का अशक्य वाटावे?
माझ्या मते भाषा आणि संस्कृती ह्या हातात हात धरून राहतात, वाढतात. एखाद्या समाजाची संस्कृती ही त्यांच्या भाषेतूनच नीट शिकता येते व एखादी संस्कृती नीट माहित असली तर तिच्याशी निगडित भाषा लवकर शिकता येते. आज इंग्रजी माध्यमाच्या शाळांत मुलांना फुले म्हणजे डॅफोडिल्स, फळे म्हणजे बेरीज, सण म्हणजे ईस्टर असं शिकवलं जातं. काय कळणार त्यांना कप्पाळ !!
असो. आपण केवळ स्वभाषेचे प्रेम, चिकाटी आणि सराव एवढ्या शिदोरीवर खूप काही करू शकतो. काळजीपूर्वक लिहित राहू. सरावाने सुधारणा होईलच.
{कितिही चुका झाल्या तरिही , किंवा कितिही इंग्रजी शब्द वापरले गेले ,तरिही मी मराठी लिहिणे कांही सोडत नाही.}
इंग्रजी शिकताना शब्द अडले तर ते आपण इतरांच्या मदतीने किंवा शब्दकोश पाहून शोधून काढतो. एकदोनदा असे केले की तो शब्द कायमचा ध्यानात राहतो. तसे आपण मातृभाषेच्या बाबतीत का करू नये? बस, टेबल असे काही शब्द सोडले तर व्यवहारातील बहुतेक शब्दांना मूळ मराठी शब्द उपलब्ध असतात पण ते अनुपयोगाने विसरले गेलेले असतात. असे झाले तर भाषेचे संवर्धन होण्या ऐवजी तिचा संकोच, अधोगतीच होईल. अत्यावश्यक व अपरिहार्य असेल तेव्हाच परभाषिक शब्द वापरावे असे मला वाटते. मावशी जरी श्रीमंत असली तरी आपण दररोज तिच्याकडे जेवायला जात नाही. आईचं पिठलं-भाकरही आपण आनंदाने जेवतो. (खरं म्हणजे, आपली आईसुद्धा सुदैवाने खूप संपन्न अशीच आहे.)
मराठी शब्द अडले तर कधीही amrutayatri@gmail.com वर लिहा. आम्ही सर्वजण यथाशक्ती मदत करू.
{मराठी चे शत्रू म्हणुन एक लेख माझ्या ब्लॉग वर पोस्ट केला होता, कांही दिवसांपुर्वी. त्याची लिंक इथे दिलेली आहे}
आभारी आहे. अनुदिनी पाहिली, लेख आवडला व प्रतिक्रियादेखिल धाडल्या.
{मराठीचं जर पुनरुज्जिवन करायचं असेल तर आधी सगळ्या मराठी भाषिकांनी एकत्र येणं आवश्यक आहे. जर,आपल्या – आपल्यातच फुट पडली, तर कांहीच होणं शक्य नाही. मराठी लोकांच्यामधली एकी ही सध्या काळाची गरज आहे असे मला वाटते.पुन्हा एकदा अभिनंदन.. आणि पुढिल लिखाणासाठी शुभेच्छा..}
आपल्या भावनांशी सहमत आहे. पण “पुनरुज्जीवन” हा शब्द थोडा खटकला. अजुनही मराठी भाषा तेवढी मृतवत् झालेली नाही. अर्थात आपल्या व शासनाच्या अनास्थेमुळे ती लवकरच होईल, हे देखिल खरेच. तरीही इंग्रजीच्या पुनरुज्जीवनाच्या (चार शतकांपूर्वीच्या) काळातील इंग्रजीपेक्षा मराठी भाषा तेव्हाही व आजही बरीच सुस्थितीत आहे. पण अर्थात आणखी एका पिढीने अशीच अवहेलना केली तर ती केवळ खासगीत बोलायची बोली भाषा होईल. त्या साठी तुमच्या पिढीने जिद्दीने काम करायला पाहिजे व भाषाभिमान सर्वत्र पसरवून राजकारण्यांवर दबाव आणायला पाहिजे. (आमची पुढी पूर्णपणे अयशस्वी ठरली.)
आपल्या सारख्या नवीन पिढीतील युवकांच्या मनात अजुनही स्वभाषेबद्दल, स्वसंस्कृतीबद्दल अभिमान शिल्लक आहे हे पाहून आनंद व आशा वाटते.
क०लो०अ०
अमृतयात्री