मराठी शाळांची थडगी उभारण्याचं धोरण थांबवा (ले० प्रा० दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र)

भारतातील सर्व भाषाभिमानी राज्यांनी आपापली राज्यभाषा शालेय शिक्षणात (पाचवी ते दहावी) सक्तीची केलेली आहे. तेथील राज्यशासन बहुजनसमाजापर्यंत ज्ञान पोचवण्याच्या दृष्टीने स्थानिक भाषेतील शाळांना व महाविद्यालयांना जास्तीतजास्त मदत करतात. भाषाभिमानाच्या बाबतीत कुठलाही पक्ष मोडता घालू शकत नाही, अगदी कॉंग्रेस व कम्युनिस्ट पक्ष देखिल. मात्र महाराष्ट्रातील परंपरेनुसार स्वभाषा आणि स्वसंस्कृती याबद्दल पूर्णपणे अनास्था आढळते. आपण परक्यांची खुशामत करण्यातच ’यशवंत’ होण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातच धन्यता मानतो.

प्रा० दीपक पवार, (अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र) यांनी लिहिलेला खालील लेख पहा.

दिनांक २ ऑक्टोबरच्या वर्तमानपत्रांत मुंबई महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांतील मुलांची संख्या कमी झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरणार्‍या महात्मा गांधीच्या जंयतीच्या  दिवशी अशा बातम्या याव्यात हा दुर्देवी योगायोग आहे. अर्थात ही गोष्ट अचानक घडलेली नाही. मराठी शाळाकंडे वर्षांनुवर्षे झालेलं स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासनाचं दुर्लक्ष यांचा हा परिणाम आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या मराठी शाळांची पायाभूत सुविधा, शिकविण्याचा दर्जा या सर्वच बाबतीत अत्यंत वाईट अवस्था आहे. अशा परिस्थितीत पालकांनी खाजगी आणि  इंग्रजी माध्यमांचा मार्ग चोखाळला तर त्यांना सर्वस्वी दोष देता येणार नाही. मात्र पालकांची मानसिकता इतक्या निर्णायकपणे बदलेपर्यंत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष विशेषत: मराठीच्या नावाने मते मागणारे पक्ष इतके वर्षे काय करीत होते असा प्रश्न पडतो.

पूर्ण लेख खालील दुव्यावर पहा.

मराठी शाळांचं थडगं बाधणारं धोरण_मअके_021009

ह्यातील विचार आपल्याला पटले तर हा लेख इतरांनाही दाखवा. आपली साधक-बाधक मते अवश्य कळवा.

– अमृतयात्री

6 thoughts on “मराठी शाळांची थडगी उभारण्याचं धोरण थांबवा (ले० प्रा० दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र)

  1. दिपक पवारांचा लेख अतिशय उत्तम आणि संग्रहणिय आहे. विचार करायला लावणारा हा लेख आहे. मनापासुन आवडला. इथे पोस्ट केल्याबद्दल आभार.
    अतिशय उत्तम पोस्ट..

    • प्रिय महेंद्र,
      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. प्रत्येक मराठी हृदयाला स्पर्श करील असाच तो लेख आहे. प्रा० दीपक पवारांचा “मराठी बांधवांनो!” हा लेख देखिल तितकाच अप्रतिम आहे. अवश्य वाचा. मराठी माणसाच्या कळकळीच्या विषयांबद्दलचे लेख आपल्याला भाग ०३ (०३.१ व ०३.२) आणि ०४ मध्ये आढळतील. अगदी आवर्जुन वाचावेत असे लेख आहेत. वाचून पहा आणि आपल्याला “काय-वाटले-ते” नक्की कळवा. आपल्या आईच्या सेवेसाठीच तर तुम्ही-आम्ही दुकान घालून बसलो आहोत.
      क०लो०अ०

  2. नमस्कार
    मला खरोखर मनापासून या विषयावर चर्चा करायला आवडेल. मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेली आहे. पण आज माझ्या मुलीला शाळेत घालताना मात्र माझ्यासमोर इंग्रजी शिवाय पर्याय दिसत नाही. अशावेळी समांतर उपक्रम घरापासुनाच सुरु करण्याचा विचार मनात प्रखर पणे येवू लागलाय. यावर सुद्धा तुमचे आणि राईलकर सरांचे मार्गदर्शन घ्यायला आवडेल.
    अनुदिनी म्हणाल, तर ती म्हणजे मनातल्या विचारांचा निचरा करण्याची एक जागा आहे. या प्रश्नावर काहीस सुचलेल माझ्या दुसर्या ब्लॉग मधून काही महिन्यांपूर्वी मांडल होत. ते इथे देत आहे.
    http://mi-sonal.blogspot.com/2009/02/blog-post_17.html

    धन्यवाद्
    सोनल

    • प्रिय सौ० सोनल वायकूळ यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      उत्तराला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. इतर नेहमीच्या कामांच्या व्यापातून ह्या अनुदिनीची हौस पूर्ण करायची म्हणजे तसे थोडे कठीणच जाते. पण लष्करच्या भाकर्‍या भाजायचे व्यसन लागले की मग अशी ओढाताण सहन करायला पाहिजेच. आपणही घरच्या पोळ्या भाजून मग वर ह्या बाहेरच्या भाकर्‍या भाजण्याचे काम करीत आहात; तेव्हा आपल्याला कल्पना असेलच.

      मी आपल्या विरोपपत्त्यावर काही माहिती पाठवीन. त्यावर आपण चर्चा करू. मला शक्य तेवढी मदत करायला नक्कीच आवडेल. राईलकर सरांचाही सल्ला घेऊ.

      आपण दिलेल्या दुव्यावरील अनुदिनीमधील लेख वाचला. आपण नक्कीच चांगले लिहू शकता. थेट विरोपाच्या चर्चेमध्ये माझे अभिप्राय/सूचना पाठवीन. उत्स्फूर्त लेखन म्हणजे मनातील भावनांचा निचराच तर असतो. जे आपल्याला उत्कटपणे मनात वाटत असतं ते इतरांसमोर मांडणे म्हणजेच तर खरे स्वयंभू, मनातून थेट कागदावर उमटलेले विचार. त्यात कृत्रिमपणा नसतो. ठरवून लिहिलेले व्यावसायिक लेखन तसे नैसर्गिक होऊ शकणार नाही. पूर्वीच्या जुन्या भावगीतांचे काव्य आणि संगीत आणि आज धंदा म्हणून पाडलेल्या गाण्यांचे शब्द आणि संगीत यात तोच तर फरक असतो.

      आभार.

      क०लो०अ०

      अमृतयात्री

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s