आपले एक पुण्याचे मित्र श्री० सलील कुळकर्णी यांनी सांगितलेला एक भावपूर्ण अनुभव. वाचून पहा आणि आपल्या भावना अवश्य कळवा.
—————————————
प्रिय मराठी बांधवांनो,
सप्रेम नमस्कार.
मी मध्यंतरी काही कामानिमित्त कोल्हापूरला गेलो होतो. तिथून एके दिवशी मराठी माणसाच्या पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक अशा पन्हाळगडाला भेट दिली. तिथे आलेला अनुभव मला तुम्हाला सांगावासा वाटतो. महाराष्ट्राचा इतिहास आणि त्याचे वर्तमान यात जमीन-अस्मानाचा फरक झाला आहे, केवळ ऐहिक प्रगतीच्या दृष्टीनेच नव्हे तर अगदी मूलभूत स्वभाव वैशिष्ट्य़ांमध्येसुद्धा. स्वदेश व स्वसंस्कृतीसाठी दिल्लीच्या मोगलाईशी प्राणपणाने लढणारा मराठी माणूस आज दिल्लीश्वरांपुढे गोंडा घोळण्यात धन्यता मानतो. फारशी, अरबी भाषांमधील शब्दांच्या आक्रमणापुढे मराठी भाषा लोप पावण्याची भीती ओळखून मराठीभाषाशुद्धीसाठी मराठीतील (बहुधा देशातील) पहिला राजव्यवहार शब्दकोश बनवून घेणार्या पराकोटीची दूरदृष्टी असलेल्या शिवछत्रपतींचे वंशज म्हणवणार्या आपणाला आज आपल्या राज्यात आपल्या मायबोलीची व संस्कृतीची पूर्णपणे उपेक्षा करून इंग्रजी आणि हिंदी भाषांची जबरदस्ती करण्याच्या प्रयत्नांबद्दल काहीही खंत न वाटता उलट त्यात प्रतिष्ठा वाटते.
हा टोकाचा परस्परविरोध मला पन्हाळा-भेटीत अधिक प्रकर्षाने जाणवला व त्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही ही हतबलता लक्षात येताच शरमेने मान खाली झाली.
माझी ही रडकथा तुम्हालाही ऐकवावी व माझ्या दुःखात सहभागी करून घ्यावे या उद्देशाने हे पत्र लिहित आहे. (आनंद एकटाच उपभोगावा आणि दुःखात मात्र वाटेकरी शोधावे असा माणसाचा स्वार्थी स्वभाव असतो, त्यालाही हे धरूनच आहे म्हणा.)
पन्हाळा हे कोल्हापूरपासून केवळ २० कि०मी०वर सह्याद्रीच्या कुशीत वसलेले सुमारे ४००० लोकवस्तीचे एक गाव. क्षेत्रफळ विस्तीर्ण म्हणजे ४०० एकराचे असले तरीही तसे हे खेडेच. जमीन ही काळ्या कातळाची व जांभा दगडाची असल्यामुळे शेती अशी नाहीच. गुरांना चरायलाही फारशी माळराने नाहीत. पाण्यासाठी विहीरी मात्र बर्याच आहेत असे म्हणतात. पण एकंदरीत शेती व दूधदुभत्याच्या अभावामुळे येथील स्थानिक जनता उदरनिर्वाहासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मुख्यतः पर्यटनावरच अवलंबून. पण पर्यटन व्यवसायही पूर्णपणे ऋतुकालावर अवलंबून (seasonal) असल्यामुळे एकंदरीत तशी गरीबीच आढळते. शिक्षणाचे प्रमाणही फार नसावे. एकूण लोकसंख्येपैकी बरेच मुसलमान आहेत आणि तेही शिवाजी महाराजांवर प्राणापलिकडे निष्ठा असणारा व त्यांच्यासाठी बलिदान करणारा पन्हाळ्याचाच सिद्दी वाहब (महाराजांचा अंगरक्षक सिद्दी हिलाल याचा मुलगा) याच्या नावाने शपथ घेणारे. सर्वांची मातृभाषा, (पितरभाषासुद्धा) मराठीच.
आदिलशहाचा मुख्य सरदार अफझलखान याचा वध झाल्यानंतर १८च दिवसांनी म्हणजे २८ नोव्हेंबर १६५९ या दिवशी शिवाजी महाराजांनी हा किल्ला अदिलशहाकडून जिंकून घेतला आणि किल्ल्याचे व्यूहात्मक महत्व (strategic importance) ओळखून त्याला उपराजधानीचा दर्जा दिला. या घटनांनी संतापलेल्या आदिलशहाने आपला सरदार सिद्दी जोहर यास ५०-६० हजाराच्या फौजेनिशी पन्हाळ्याच्या स्वारीवर पाठवले. सिद्दी जोहराने किल्ल्यास वेढा दिला. ४ महिने १० दिवस वेढ्यात अडकून पडल्यावर गडावरील दाणावैरण संपू लागली आणि शेवटी १२ जुलै १६६० रोजी शिवाजी महाराजांनी नाईलाजाने हा किल्ला सोडून जाण्याचा निर्णय घेतला. राजांसारखा दिसणारा व जातीने न्हावी असणारा वीर मावळा शिवा काशीद लाखाच्या पोशिंद्याचा जीव वाचविण्यासाठी त्याच्यासारखे वेषांतर करून बलिदानाच्या तयारीने सिद्दी जोहरच्या भेटीला पुढच्या दरवाजाने गेला आणि मागल्या पश्चिमेकडील दरवाजाने राजे पौर्णिमेच्या रात्री पालखीतून गडाबाहेर निसटले व विशाळगडाकडे निघाले. इथे सिद्दी जोहरला फसगत लक्षात आल्यावर त्याने पालखीतून जाणार्या महाराजांना पकडण्य़ास घोडदळ पाठवले. त्यांना घोडखिंडीत तुटपुंज्या मावळ्य़ांसह अडवून ठेवून राजे विशाळगडावर पोचल्याच्या तोफा ऐकेपर्यंत जीव कुडीत धरून ठेवणारा वीर बाजी प्रभू देशपांडे याच्या रक्ताने पावन झालेला तो पावन खिंडीचा परिसर मराठी माणसाच्या दृष्टीने तीर्थक्षेत्रच आहे.
अशा त्या पन्हाळ्याची कहाणी आमचा वाटाड्या राजू मुल्ला याने (तो एक स्वाभिमानी मराठी मुसलमान होता) मोठ्या त्वेषाने सांगितली. ती ऐकताना माझी छाती अभिमानाने फुलली होती व वीररसाने चेतलेले ऊष्ण रक्त धमन्यातून वाहताना कान गरम आणि चेहरा तांबडालाल झाला होता, हाताच्या मुठी वळल्या होत्या. मुद्दामच गाडी न वापरता चार तास पायी गडावर फिरून आम्ही तो वीरपट पाहिला, अनुभवला. वाटाड्याने आपले काम संपवले तरीही बराच काळ मन छत्रपतींनी शिकवलेल्या स्वाभिमानाच्या भावनास्थितीतच गुंतले होते.
पण नंतर लवकरच काही अशी दृष्ये पाहिली की आमच्या छातीतील स्वाभिमानाची हवाच निघून गेली व धमन्यातील वीररसाने तापलेले रक्त शरमेच्या भावनेने गोठून गेले.
पन्हाळ्याच्या यूनियन (यून्यन?) बॅंकेच्या समोर उभे राहून आपल्या मायबोलीचा अपमान पाहिल्यावर महाराजांना दिल्लीच्या दरबारात औरंगजेबापुढे उभे राहिल्यावर जसे अपमानित वाटून चीड आली असेल तसेच क्षणभर वाटले. पण त्यानंतर आजचा नेतृत्वविहीन मराठी माणूस अशा बाबतीत निमूटपणे अपमान गिळून गप्प बसण्याशिवाय काहीही करू शकत नाही ही वस्तुस्थिती लक्षात येताच आपल्या अशा भिकारराष्ट्राची लाज वाटली. आजचा मराठी माणूस शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादी थोर मराठी पुढार्यांनी शिकवलेले सर्व आदर्श विसरून पुन्हा महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या पूर्वीच्या काळातील गुलामगिरीच्या स्वभावावर गेलेला आहे. फक्त शासनकर्ते, दिल्लीश्वर बदलले. पण त्यांची दडपशाहीची वृत्ती आणि महाराष्ट्राचा सत्तेपुढे नांगी टाकण्याचा स्वभाव तसाच आहे.
खालील दुव्यावरील चित्रपुस्तिकेमधील छायाचित्रे क्रमाने पहा व त्यांच्या क्रमांकानुसार खाली दिलेले टिपण वाचा.
http://picasaweb.google.co.in/amrutyatri/LbllTI?authkey=Gv1sRgCIHrrey27qmKhAE&feat=directlink
१. वीररत्न बाजी प्रभू देशपांडे यांचा पुतळा. लुब्रेपणाने गुलामगिरीचे आयुष्य जगण्यापेक्षा स्वराज्यासाठी स्वाभिमानाने प्राणार्पण करावे असेच तर या सर्व वीर मराठ्यांचे म्हणणे होते. आणि थोर व्यक्तींचे पुतळे त्यांनी दाखवलेल्या आदर्शांची आपल्याला पुनःपुन्हा आठवण व्हावी म्हणून तर उभारले जातात.
२. पन्हाळा गावातील यूनियन बॅंकेच्या प्रवेशद्वारावरील नावाचा फलक. भाषा- इंग्रजी, मराठी, हिंदी. त्यांचा प्राधान्यक्रम/महत्वक्रम- इंग्रजीला सर्वात जास्त दृश्यमहत्व व राज्यभाषा मराठी दुसर्या क्रमांकावर. केवळ नावापुरता मराठीचा मुख्य नामफलकावर उल्लेख. बाकी पूर्णपणे दुर्लक्ष.
३. प्रवेशद्वारावर लावलेली बॅंकेची घोषणा- फक्त हिंदीमध्ये. मराठी मात्र पूर्णपणे दुर्लक्षित. दिल्लीश्वर म्हणतात – “बदले हैं हम”. पण ते इतर भाषिक राज्यांच्या बाबतीत. मराठी माणसावर भाषा लादणे चालूच आहे. नाहीतरी आजचा मराठी माणूस लोचट, निरभिमानी, अल्पसंतुष्ट आणि खेकड्याप्रमाणे एकमेकांचे पाय ओढण्यात धन्यता मानणारा असाच आहे. ते म्हणतात- “हमारा नया लोगो इस बदलाव का प्रतीक है”. याचा अर्थ पन्हाळ्यातील दोन टक्के लोकांनाही कळणार नाही. आणि तो कळावा अशीही कोणाची इच्छा नसावी. (मलासुद्धा हे सर्व “कौन लोगोके बारेमें” बोलत आहेत हे कळायला बराच वेळ लागला.)
४. ग्राहकांना धन्यवाद फक्त हिंदीमधून, मराठीचा प्रश्नच नाही. “कारोबारी लक्ष्य को प्राप्त करमे में आपके सक्रिय सहयोग हेतु” ह्याचा अर्थ पन्हाळ्याच्या शाळेतील हिंदी विषयाचे शिक्षक (कोल्हापुरी भाषेत – हिंदीचं मास्तर) तरी सांगू शकेल काय? या बॅंकेचं घोषवाक्य आहे, “अच्छे लोग, अच्छा बैंक”. अर्थात हा विनयशीलतेचा गुणदेखिल केवळ हिंदी भाषकांसाठी, त्यांच्याच भाषेत. पन्हाळ्याच्या गावकरी मराठी माणसांना तसे पटवून देण्याची आवश्यकताच काय?
५. ग्राहकांच्या तत्पर सेवेसाठी आणि त्यांच्या तक्रार निवारणासाठी माहिती. ही सुविधा देखिल फक्त हिंदी भाषकांसाठीच. मराठी माणसांची सेवा करायची इच्छा कोणाला आहे?
६. बॅंकेच्या कामाच्या वेळेसंबंधी माहिती. एवढी साधी माहितीसुद्धा जाणून घेण्याचासुद्धा पन्हाळ्यासारख्या गावातील मराठी ग्राहकाचा अधिकार नाही !
७. रिझर्व बॅंकेने प्रसिद्ध केलेली बनावट नोटा ओळखण्यासंबंधीची माहितीपत्रके. ही बंगाली, तमिळ, आसामी, उर्दू इ० सर्व राजभाषांत उपलब्ध असणारच. त्यात नावापुरती मराठीतही छापली असतील. पण पन्हाळ्यासारख्या लहान गावातही स्थानिक भाषेत माहिती उपलब्ध करून देण्याची इच्छा नाही. महाराष्ट्रातील दुय्यम दर्जाच्या मराठी नागरिकांची काळजी कोणी व कशाला करावी? शिवाय रु. १००, ५००, १०००च्या नोटा या अडाणी मराठी माणसांच्या दृष्टीला तरी पडतात का? त्यांना या पत्रकाचा काय उपयोग? म्हणून हे पत्रक इंग्रजी व हिंदी जाणणार्यांसाठीच प्रसिद्ध केलेले दिसते आहे.
८. धूम्रपान प्रतिषिद्ध (मनाई) असल्याबद्दलच्या पाट्या. केवळ हिंदी आणि इंग्रजीमधून. पन्हाळ्यातही आम्हाला हिंदी व इंग्रजी भाषिक ग्राहकच हवेत. लोचट मराठी माणसे हवीत कशाला?
९. तीच गोष्ट कर्जदार व चालू खातेदारांच्या बाबतीत. ह्या सुविधा उद्योजकांना लागतात. कर्जे घेऊन धंदा करण्यासाठीही गाठीला मूळचा पैसा असायला लागतो आणि कर्ज कौशल्यपूर्वक बुडवण्यास तर विशेष बुद्धी लागते. त्यामुळे या सुविधा निरुद्योगी आणि भणंग मराठी माणसांना नाही. त्यांनी फारतर शेती किंवा चाकरी करावी व अंथरूण पाहून पाय पसरून (डोक्यावरून पांघरूण घेऊन) झोपावे. त्यांना कर्ज हवे कशाला आणि देणार तरी कोण?
१०. मोठ्या रकमा खात्यातून काढणे हे मराठी लोकांचे कामच नाही. त्यामुळे त्या संबंधीच्या सूचनादेखिल मराठीत असण्याची आवश्यकता नाही. रोख पैसे भरण्यासाठी खिशात पैसे असावे लागतात व खात्यातून काढण्यासाठी खात्यात पैसे असावे लागतात. आम्ही मुंबई-पुण्यातही हिन्दी-इंग्रजी बोलणार्या ग्राहकांनाच सेवा द्यायची इच्छा असते; तर पन्हाळ्यामधील गोरगरीब मराठ्यांना आम्ही का भीक घालणार? मुंबईत म्हणतातच ना – “मुंबई घ्या तुमची, पण भांडी घासा आमची”.
बॅंकेच्या व्यवस्थापकाच्या समक्ष मी मुद्दाम बॅंकेमध्ये कामासाठी आलेल्या व बॅंकेबाहेर उभ्या असलेल्या (छायाचित्र क्रमांक २ पहा) सामान्य पन्हाळावासी लोकांना विचारले की या हिंदी व इंग्रजी पाट्यांपैकी तुम्हाला किती पाट्यांचा अर्थ कळला? एकाही गावकर्याला कुठलीही पाटी समजली नव्हती. “मग हा अट्टाहास का व कोणासाठी? इतर राज्यात त्यांच्यात्यांच्या राज्यभाषेत माहिती लिहिली जात असता केवळ महाराष्ट्रातच ही हिंदीची दादागिरी का? लिपी सारखी असल्याने असे जर केले जात असेल तर महाराष्ट्रात मराठीतच पाट्या लावाव्यात व हिंदी भाषिकांनी तीच लिपी वाचून अर्थ समजावून घ्यावा. स्थानिक माणसावर अन्याय का?” पण त्या मराठी बॅंक-व्यवस्थापकाकडे या प्रश्नांना काहीही उत्तर नव्हते.
मला एक सांगा. अशी दृश्ये तमिळनाडू, केरळ, बंगाल, आसाम, ओरिसा, गुजरात इ० राज्यातील गावात तर सोडाच पण शहरात तरी दिसतात काय? मुंबई-पुण्याला बहुभाषिक म्हणणारे महाभाग बंगळूरू व कोलकात्यामध्ये त्यांच्या भाषेमध्ये व्यवहार करतात आणि आमच्या राज्यात पन्हाळ्यासारख्या खेड्यात मात्र हिंदी-इंग्रजीची जबरदस्ती करतात. ह्या मागची कारणे काय?
आपल्याला माहित असेलच की बंगळूरू शहरात गेली अनेक दशके कानडी भाषकांपेक्षा तमिळ भाषक अधिक आहेत. पण त्याचा परिणाम कुठल्याही शासकीय किंवा खासगी दळणवळणात (संज्ञापनात) दिसून येत नाही. सर्वत्र तोंडी व लेखी माहितीसाठी कानडीलाच सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. पण महाराष्ट्रातील सर्व शहरातच नव्हे तर अगदी आडगावात देखिल मराठीला कटाक्षाने दुर्लक्षित केली जाते.
या सर्वामागे एकच तत्त्व आहे. अन्याय करणार्या पेक्षासुद्धा तो मुकाट्याने सहन करणारा हा अन्यायास अधिक जबाबदार असतो. दुसर्याने कानशिलात लगावली तर “तो अन्याय नाही, त्याने प्रेमाने मला चापटी मारली” असे मानणार्या निर्लज्ज, निरभिमानी लोकांना न्याय कसला आणि अन्याय कसला? (इथे कृपया महात्मा गांधींना मध्ये आणू नका. गांधीजींनी स्वतः असा जुलूम अमान्यच केला असता. गांधीजींनी भाषाविषयक विचारांवर अनेक सुंदर लेख लिहिले आहेत.)
स्वाभिमानशून्य मराठी माणूस इतका लोचट आणि थप्पडखाऊ झाला आहे की अशा गोष्टींच्या बाबतीत तो गांधीजींच्या माकडांचा दाखला देऊन “अन्याय पाहू नकोस, अन्याय ऐकू नकोस व अन्यायाविरुद्ध बोलू नकोस” असे स्वतःला बजावून अशा वेळी आपले डोळे, कान आणि तोंड ही ज्ञानेंद्रियांची भोके तर बंद करतोच पण स्वतःच्या स्वाभिमानाची सुरळी करून, तिचे बूच मारून आपल्या इतर सर्व संवेदना देखिल बुजवून टाकतो. स्वतःच्या भाषेबद्दल दुरभिमान नसावा; दुसर्याच्या भाषेबद्दल तिरस्कार नसावा. पण स्वाभिमान म्हणजे संकुचितपणा आणि निरभिमान म्हणजे विशाल हृदयाचे लक्षण असं तर नाही ना? म्हणूनच मराठी माणसाचा अशा प्रकारचा स्वाभिमान ते निरभिमान असा प्रवास पाहून मन अगदी विषण्ण होतं.
आणखी काय लिहू?
कळावे,
आपल्यापैकीच एक मराठी बांधव,
सलील कुळकर्णी
हे खर आहे …मीही अनुभवल आहे ….
प्रिय अपेक्षा,
योग्य अभिप्रायाबद्दल आभार. आपल्या मनातील स्वभाषेबद्दलची कळकळ आणि सध्याच्या परिस्थितीबद्दलची चीड मला समजते, किंबहुना ती माझेसुद्धा काळीज पोखरते.
आपण सर्वच जण हे सतत अनुभवत असतो, अर्थात आपण याबाबतीत डोळे उघडे ठेऊन जगत असलो, आपल्यामधील स्वाभिमानाची भावना थोडीफार तरी जिवंत असली तर, आपली संवेदनशीलता अजुनही पूर्णत: बधीर झाली नसली तरच… नाहीतर हे अनुभवही आपल्याला दिसत नाहीत, ऐकू येत नाहीत, मनाला जाणवत नाहीत, मग त्याबद्दल चीड येणे तर सोडूनच द्या. पण हे अनुभव घेतल्यावर त्याबद्दल आपण पुढे काय करायचे? नुसते अनुभवच घेत राहण्यात अर्थ नाही. जी गोष्ट इतर राज्यात घडत नाही ती आपल्याच राज्यात का घडते? भारतात सर्व भाषकांपैकी मराठी भाषकांनाच का गृहीत धरले जाते? याचे उत्तर आपण स्वतःलाच विचारायचे आहे. आपण आपल्या राज्यात असताना जिथे-जिथे शक्य असेल तिथे अभिमानाने आपली भाषाच बोलण्याचा अट्टाहास दाखवतो का? आपण सरकारी कार्यालयात, रेल-वे मध्ये, बस-टॅक्सी-रिक्शामध्ये, टपाल खात्यात, बॅंकेमध्ये, मोबाईल किंवा इतर कॉल सेंटर व इतर कुठल्याही लोकांशी संबंधित कामासाठी निश्चयाने राज्यभाषा मराठीतच बोलतो का? एटीएम, संगणक, व इतर जिथे-जिथे शक्य तोथे मराठीच्या पर्यायाचा वापर करतो का? महाराष्ट्रात सर्वत्र मराठीच वापरावी लागते आणि त्या ऐवजी दुसर्या कुठल्याही (इंग्रजी-हिंदी इत्यादी) भाषेने काम होणार नाही असे लक्षात आल्यावर सर्वत्र मराठी भाषा आपोआपच वापरली जाऊ लागेल. हे इतर राज्यात प्रथमपासूनच आहे, अगदी ओरिसा, आसामसारख्या गरीब राज्यांतही सामान्यजनांना गृहीत धरले जात नाही. मुंबईमध्ये तीस-चाळीस वर्षांपूर्वी व इतर ठिकाणी दहा वर्षांपूर्वी बर्यापैकी होते, ते आज आपण महाराष्ट्रात सर्वत्र घडवायलाच पाहिजे. तमिळनाडू, बंगाल, आसाम, ओरिसात जे शक्य आहे ते महाराष्ट्रात आपण मनात आणले तर घडवू शकत नाही काय? राजकारण्यांनाही इतर राज्यांप्रमाणे जनमताचा रेटा जाणवायला हवा. तसे झाले तर हे प्रश्न नक्कीच सुटतील; राजकारण्यांप्रमाणे केवळ निवडणुकांच्या तोंडावर घोषणा करून नाही.
अशाच प्रकारचे “मराठी बांधवांनो”, “आळशी मराठी माणूस”, “पिठांत मीठ”, “हिंदी राष्ट्रभाषा-एक गैरसमज” इत्यादी लेखही वाचून पहा. या विषयावर वेळोवेळी आणखीही लेख प्रकाशित होतील. लक्ष राहू द्या. आवश्यक वाटल्यास RSS Feed वापरून संपर्कात रहावे. आपल्या प्रतिक्रिया, कौतुक किंवा टीका, जाणून घेण्यास नक्क्कीच आवडेल. तेच तर खरे अमृतमंथन.
– अमृतयात्री
i am writing this in english only bcoz there is no facility to write in marathi. anyways
this is also my experience in my city Badlapur in UNION BANK. All notices were in hindi and marathi… ekda mi ti notice phadun takli ani tithe penane lihile ki notice marathit lava. pan kahich farak padat nahi. Atta tar nakkich kahitari karnaar mi.
प्रिय श्री० सचिन यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या स्वाभिमानी पत्राबद्दल अत्यंत आभारी आहोत.
आपला अनुभव हा सार्वत्रिक आहे. पण केवळ प्रतीकात्मक निषेध करून काहीच उपयोग नाही. कारण महाराष्ट्रातील मराठीद्वेष्टे हे अत्यंत जाड चामडीचे आहेत व त्यांना आपल्याच राज्यकर्त्यांचे अभय व फूस आहे.
खालील दोन लेख (मराठी व इंग्रजीमधील) वाचा.
https://amrutmanthan.wordpress.com/2010/04/04/बॅंकिंग-क्षेत्रामधील-भाष/
https://amrutmanthan.wordpress.com/2010/04/13/linguistic-policy-in-banking-sector-a-case-of-complete-neglect-in-maharashtra/
ह्या लेखांत केंद्र सरकारच्या त्रिभाषासूत्राचे व रिझर्व बॅंकेच्या ग्राहकसेवेसंबंधीच्या परिपत्रकातील विशिष्ट भाषाविषयक तरतुदींचे संदर्भ दिलेले आहेत. त्या संदर्भांसह आपण यूनियन बॅंकेला जाब विचारावा. यूनियन बॅंक ही राष्ट्रीयीकृत बॅंक असल्यामुळे त्यांना माहिती अधिकाराखाली पत्र लिहिल्यास ते अधिक परिणामकारक ठरेल. पत्राची प्रत मुद्दाम रिझर्व बॅंकेलाही पाठवावी, म्हणजे यूनियन बॅंकेला आपल्या उद्दिष्टांच्या मागील गांभीर्याची नीट कल्पना येईल. “३५-४० वर्षांपूर्वी जाहीर केलेले त्रिभाषासूत्र व अनेक वर्षांपूर्वी रिझर्व बॅंकेने सर्व अनुसूचित बॅंकांना उद्देशून जारी केलेली विविध परिपत्रके (ज्यांचे संकलन ३ नोव्हेंबर २००८च्या प्रस्तुत परिपत्रकात केलेले आहे) अस्तित्वात असूनही त्यांची आपल्या बॅंकेच्या महाराष्ट्रातील शाखांमध्ये व इतर कार्यालयांमध्ये अंमलबजावणी न करण्याची कारणे काय आहेत ह्याची कृपया माहिती द्यावी” अशी विनंती करावी. शिवाय “ज्या बाबतीत अंमलबजावणी केलेली नाही त्या बाबतीत योग्य अंमलबजावणी करण्याबाबत आपली काय योजना आहे व तशी अंमलबजावणी किती दिवसांत होईल ह्याचीही माहिती द्यावी” अशीही विनंती माहिती अधिकाराखाली करावी.
आपल्या पत्रात रिझर्व बॅंकेच्या परिच्छेदांचा संदर्भ देऊन पाट्या, नामफलक, माहितीफलक, सूचनाफलक, काऊंटरवरील फलक, सर्वसमाईक माहितीफलक, माहितीपुस्तके, माहितीपत्रके, सर्वच्या सर्व फॉर्म (पे-इन-स्लिप, पासबुक, खाते उघडण्याचा फॉर्म व असे इतर सर्वच), ग्राहकतक्रारनिवारण यंत्रणा, जनसंपर्क, ’मदती’साठीचा काऊंटर व अशा इतर प्रत्येक लेखी-तोंडी, दृक-श्राव्य, संवादासाठी व संज्ञापनासाठी (communication), बॅंकेने स्थानिक मराठी भाषेचा वापर करणे नियमानुसात अत्यावश्यक आहे हे आपण त्यांच्या दृष्टीस आणून द्यावे. कृपया हेसुद्धा लक्षात घ्यावे की हे सर्व भाषाविषयक नियम बॅंकांच्या केवळ शाखांनाच नव्हे तर एटीएम, पतपत्रिका (क्रेडिटकार्ड), कर्जे यांबद्दलच्या व जिथे सामान्य ग्राहक किंवा सामान्य नागरिकाला सेवा पुरवली जाते अशा इतरही सर्व कार्यालयांना लागू आहेत.
मात्र एक कळकळीची विनंती. परप्रांतीयांनी व विविध आस्थापनांनी आपल्या राज्यात सर्व व्यवहार प्राधान्याने मराठीतच केला पाहिजे असे म्हणताना आपण स्वतः प्रथम बोलणे-लिहिणे मराठीतच केले पाहिजे. मराठीमधील पे-इन-स्लिप मागवून घ्यायची व ती इंग्रजी भाषेमध्ये भरायची असे होता कामा नये याची आपण प्रत्येकाने दक्षतेने काळजी घ्यायला पाहिजे.
कुठल्याही प्रकारे मदत, सल्ला, माहिती हवी असल्यास निःसंकोचपणे amrutyatri@gmail.com या पत्त्यावर लिहावे.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
Jevha Pawara sarakhe leader Delhishwar[? are to kasala Eshwar to Eshwarachya navala dhabba ahe.]chye paya chepit basalay jyala apan great maratha samjato.Ani hriday samrat dadhi kurwalat basaley porasathi maratrhi janatela dosh deto to kasala leader ani neta.Sale sagle nebhalat ahet ekjat.charch kara,maganya maga mag te bhik ghalatil tumachya…? apanach murkh ahot,hijade ahot dusara kay.
…. khup diwasapasunchi dokyat sachaleli maragal saf zyalya mule jara bar vattay.
प्रिय श्री० सेवकराम,
सप्रेम नमस्कार.
आपल्या प्रतिक्रियेवरून आपल्या मनातील चीड, राजकारण्यांबद्दलचा तिरस्कार स्पष्टपणे समजतो आणि मला तो पटतो देखिल. मराठी राजकारणी हे खरोखरच मराठी माणसाच्या स्वाभिमानी इतिहासाला काळिमा लावतात. ते नेभळट नाहीत. ते अत्यंत स्वार्थी आणि कावेबाज आहेत. पण सर्वच राज्यातील राजकारणी तसेच असतात. फरक एवढाच की त्या राज्यांतील सामान्य जनता स्वभाषा आणि स्वसंस्कृतीबद्दल अत्यंत स्वाभिमानी असते. त्याबाबतीत कसलीही तडजोड चालवून घेत नाही. त्यामुळे सर्वच पक्षांचे राजकारणी तिथे भाषा व संस्कृती या मुद्द्यांवर एकमताने स्थानिकांची बाजू घेतात; नाहीतर ते जनतेला तोंडच दाखवू शकणार नाहीत. तसे महाराष्ट्रात होत नाही. कारण महाराष्ट्रात मराठी माणसालाच स्वतःच्या भाषेबद्दल व संस्कृतीबद्दल अभिमान नाही; उलट न्यूनगंडच आहे. आपल्याला मराठी म्हणवण्याची लाज वाटते. आपण सर्वत्र हिंदी-इंग्रजीत बोलतो.मग आपल्या राजकारण्यांना तरी स्वभाषेबद्दल अभिमान, चाड का असावी? खाण तशी माती. या सर्व परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील राजकारण्यांना मराठी भाषा-संस्कृती-माणूस आणि त्यांच्या समस्या ह्या मुद्द्यांचे महत्त्वच वाटत नाही. कारण आपणच नेभळट आहोत. आपणच षंढ आहोत. स्वतःबद्दल ज्यांना अभिमान नाही त्यांना इतर लोकं काय मान देणार? ही सर्व परिस्थिती आपणच बदलू शकतो. आपण राजकारण्यांनाही बदलायला भाग पाडू शकतो. पण त्यासाठी मराठी या मुद्द्यावर आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे.
आपली मते वेळोवेळी सर्वांसाठी इथे कळवत जा. आपण चर्चा करू. इतरांनीही त्यात भाग घ्यावा. तेच तर होईल खरे विचारमंथन.
क०लो०अ०
अमृतयात्री
far sundar lekh ahe. samast marathi bandhwanchya dolyat anjan ghalnara lekh ahe ha. pratyek marathi manasane pratyek thikani marathicha agrah dharala pahije. ani he jyanna jamat nasel tyanni nighun jawe aplya rajyat. tumhala koni ithe yenyache amntran dilele nahi. maharashtrachi pragati marathi manasamulech zaleli ahe. baherche aalet mahnun pragati zaleli nahi. aani tasach nyaya lawayacha tharlyas dubaichi pragati bhartiy ani pakistani lokanmule zali ase mhanawe lagel. karan 35% bhartiy, 26% pakistani ani fakt 13% sthanik manase ahet.
प्रिय श्री० परेश यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभारी आहोत. आपला तर्कवाद अचूकच आहे. हल्लीच महाराष्ट्राचे नेते शरदराव पवार व अशोकराव चव्हाण यांनी उत्तरेत जाऊन महाराष्ट्राच्या वतीने क्षमा मागणारे, लाचारीचे भाषण केले व महाराष्ट्राची प्रगती परप्रांतीयांमुळेच झाली असे सांगून लोटांगण घातले. तसे असेल तर ही मंडळी स्वतःच्या राज्यांचा उद्धार का करीत नाहीत? त्या तत्त्वानुसार उत्तर प्रदेश व बिहार ही राज्ये सर्वात संपन्न असायला हवीत. मारवाड्यांचा राजस्थान महाराष्ट्राच्या मानाने मागासलेला का? शिवाय ही परोपकारी मंडळी ओरिसा, आसाम, अंदमान-निकोबार येथेही जाऊन त्यांचासुद्धा उद्धार करतील तर बरे. पवारांनी तर हिंदी हीच राष्ट्रभाषा आहे असे विधान केले. अर्थात राजकारण्यांना अभ्यास, सत्य, कायदा, प्रामाणिकपणा अशा गोष्टी कशाशी खातात याच्याशी काहीही सोयरसूतक नसतेच म्हणा.
आपले दुबईचे उदाहरण चपखलच आहे. ही राजकारणी मंडळी तिथे जाऊन म्हणतील का ती तुमची प्रगती आम्हीच केली आहे. आम्हा नसतो तर तुम्ही मागासलेलेच राहिले असता. पण तसे ही मंडळी करूच शकणार नाहीत. तसे केलेच तर दुसर्याच दिवशी भारतीयांच्या पार्श्वभागावर लाथ मिळेल व परत पाठवणूक होईल.
इतके सुंदर पत्र मराठीत लिहिले असते तर अधिकच मजा आली असती.
असो. आपण “एकच अमोघ उपाय – मराठी एकजूट !!” हा लेख वाचलात का? आपल्या सारख्या सर्वच मराठी अभिमानींनी मराठी-एकजुटीत सहभागी व्हायलाच पाहिजे.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
[…] पन्हाळा: एक अनुभव. मराठी माणसाची अधोगत… […]
Kunee vandaa nindaa aamhee karto amchaach dhandaa.
IBA /RBI ne sthaaneey bhashet poster chaapaay chyaa soochana dilyaa hotyaa,
pan aplyaa mansane LAAKHAA CHI PRINT ORDER DEUN HAJAARACH CHAAPLE ASAAVET,
ASE NEHMEECH UNAUDITED KIWAA AUDITOR LA FASAWTAA SARKHYAA GOSHTEET HOTE.
ase mudde iba chyaa najres anun dene ithe taaknyaa itkech jaroori aahe.
प्रिय श्री० मायबोली ध्वज यांसी,
सप्रेम नमस्कार.
ही आतील माहिती महत्त्वाची आहे. पण आम्हाला त्यात गती नाही तेव्हा आपणच त्यात अधिक लक्ष घालावे. आमच्या कुवतीप्रमाणे जे जमेल तेवढे आम्ही करीतच आहोत.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
Sorry for writing in English, but I will be highly obliged if you let me know how to write in Devnagari while posting comments. To avoid mis-pronunciation I am also not writing Marathi in Latin script. I too have an experience to share with you. The bank is so-called ‘BANK OF MAHARASHTRA’. It is a ‘NATIONALISED’ bank. And on account of being so, you will find only English and Hindi everywhere in its branches. None of the forms, instructions, advertisements are in Marathi. If a bank having MAHARASHTRA in it’s name does not use Marathi as a language of communication, then it is to be blamed first among all banks!
श्री० पराग सुतार यांसी,
सप्रेम नमस्कार.
१. इनस्क्रिप्ट पद्धतीने अधिक योग्य व जलद असते. म्हणून आपण बरेच लेखन करणार असल्यास नक्की हीच पद्धत वापरा. एरवीही हीच पद्धत सरळ व शुद्ध. दुसरी पद्धत म्हणजे बराहा वापरून. इनस्क्रिप्ट पद्धत वापरण्यास पहिले काही दिवस थोडा विचार व सराव करावा लागतो, तो भाग बराहामुळे सोपा होतो. पण आपण कायमचेच एका कमअस्सल, संथ, गोंधळकारी व लंगड्या इंग्रजी (रोमी) लिपी च्या कुबड्या वापरणार्या पद्धतीचे दास बनतो व मग त्यातून बाहेर येणे कठीण पडते.
अर्थात ह्या दोन्ही पद्धती लिप्यंतर (transliteration) करणार्या गूगल, गमभन, इत्यादी पद्धतींपेक्षा नक्कीच चांगल्या. अधिक माहिती खालील लेखात सापडेल. त्यातील गृहपाठ नीट केल्यास काहीही अडचण येऊ नये.
https://amrutmanthan.wordpress.com/2009/07/27/संगणकावर-युनिकोड-टंक-वाप/
२. सर्वच अनुसूचित बॅंकांना, विशेषतः राष्ट्रीयीकृत बॅंकांना आपण वठणीवर आणू शकतो. खालील लेखातील रिझर्व बॅंकेच्या नियमांचे संदर्भ देऊन बॅंकांना पत्राने आपल्या अधिकारांप्रमाणे सेवा देण्याची मागणी करावी. असे काही ’हजार’ मराठी माणसांनी केले तरी त्या वठणीवर येतील. प्रस्तुत लेखाचा उद्देश अगदी तोच आहे.
https://amrutmanthan.wordpress.com/2010/04/04/बॅंकिंग-क्षेत्रामधील-भाष/
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
Dhanywaad.
सलिल जी,
नमस्कार,
आपण पोटतिडकीने व्यथा मांडली आहे. पण तुम्ही ज्या अभिप्रायानां पोच दिली आहे ते मराठीतून लिहीले आहेत का ? हल्ली तर चार अनोळ्खी मराठी माणसंही संभाषणाची सुरुवात मराठीतून न करता हिंदीतून करताना आढळतात. आपण प्रत्येकाने दैनंदिन व्यवहारात फक्त मराठीचाच वापर करायचा संकल्प केला आणि त्याची अमंलबजावणी काटेकोरपणे केली तर मग बँक व्यव्यवस्थापनाला नव्हे तर केंद्रसरकारला देखील याचा विचार करावाच लागेल.
प्रिय श्री० विजयराव यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपले विधान शंभर टक्के खरे आहे. त्यात सर्व उपायांचा अर्क सामावलेला आहे. मराठी माणसाने स्वाभिमानाने आपली नेहमी व सर्व प्रसंगी भाषा व आपली संस्कृती ह्यांची आठवण ठेवून शक्य त्या सर्व वेळी व सर्व ठिकाणी आपल्या भाषेतून बोलणे, तिच्या आदरास, सन्मानास, प्रगतीस, संवर्धनास योग्य अशी कृती करणे एवढे जरी ध्यानात ठेवले तरी सर्व परिस्थिती हांहां म्हणता पालटू शकते.
बॅंकांच्या बाबतीत कायदा आपल्या बाजूनेच आहे. आपण सनदशीर मार्गाने चळवळ सुरू करूया. प्रत्येकाने निदान एका बॅंकेच्या तरी मागे हात धुऊन लागूया. असे मोठ्या प्रमाणात घडले तर एका वर्षात परिस्थिती बदलू शकेल.
ह्या संदर्भातील विचार अधिक सविस्तरपणे खालील लेखात व्यक्त झाले आहेत.
https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/21/एकच-अमोघ-उपाय-मराठी-एकजूट/
पण “मराठी माणसाने न्यूनगंड टाकून स्वाभिमान बाळगावा” हे विधान आपल्याच मराठी मित्रांना “आत्याबाईला मिशा असत्या तर” ह्या विधानासारखे हास्यास्पद व मूर्खपणाचे तर नाही ना वाटणार?
ता०क० आपल्या “पण तुम्ही ज्या अभिप्रायानां पोच दिली आहे ते मराठीतून लिहीले आहेत का ?” ह्या वाक्याचा अर्थ समजला नाही. आमची एखादी कृती खटकली का? काही वावगे घडले असल्यास क्षमस्व. आपण मिळून चूक सुधारू.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
[…] […]
दोन आठवड्यांपूर्वी मी काही कामानिमित्त मैसोरला गेलो होतो.
मिरज स्थानकातून गाडी जशी पुढे बेळगावच्या दिशेने सुटली आणि काही वेळाने कर्नाटकच्या हद्दीत गेली तसतसा मला प्रत्येक स्थानकावर अभूतपूर्व असा बदल जाणवू लागला.
तेथील प्रत्येक पाटीवर कन्नड भाषेला प्रथम स्थान होते.
कन्नड भाषेतील शब्दांचा आकार हा इंग्लिश पेक्षा मोठा किवा तेवढाच होता. सगळीकडे कन्नड ठळकपणे जाणवत होते.
रेल्वेतील सगळे कर्मचारी कन्नडच बोलत होते.
याउलट परिस्थिती महाराष्ट्रात आहे.
आपल्याकडे हिंदीला प्रथम स्थान ,नंतर इंग्लिश आणि नंतर जर जागा उरलीच तर देतात मराठी चिटकवून आणि तेही बर्याच वेळेला खूप चुकीच्या तर्हेने लिहिलेलं असत.
परतीच्या प्रवासात मी हुबळी स्थानकावर इडलीचा भाव विचारला तर त्याने मला कन्नड मध्येच २ इडली आणि १ वड्याची किंमत १५ रु. सांगितली . मला ते काही समजले नाही.
त्यामुळे मी तिथेच १-२ जणांना हिंदीतून विचारले की तो माणूस काय बोलतोय, तेव्हा त्यातील एकाने मला भाषांतर करून सांगितले.
सांगायचा मुद्दा एवढाच कि कर्नाटकात मला पावला पावलाला भाषेची अडचण जाणवली.(माझ्या सुदैवाने मला मैसुरात माझ्या कामासाठी आलेल्यांमध्ये बंगळुरुतील १ मराठी मुलगा भेटला, ज्याने मला परतीच्या प्रवासात यशवंतपूर पर्यंत बरीच मदत(भाषिक) केली.).
अजून १ मुद्दा
माझे महाराष्ट्र बँकेत खात आहे.
परंतु बँकेच्या नावात जरी महाराष्ट्र असला तरी तो खाते पुस्तकावर नाही.
बँकेच्या शेवटच्या काही पानांवर खातेधाराकांसाठी काही सूचना दिल्या आहेत,परंतु त्या फक्त आणि फक्त हिंदी व इंग्लिश मध्येच उपलब्ध आहेत.
काय करावे तेच कळत नाही.
मराठीत मागितला तर संकुचित वृत्तीचे ठरवून तुसड्या नजरेने बघतात साले.
प्रिय श्री० सागर यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपण लिहिलेले वाक्यन् वाक्य खरे आहे. आपण व्यक्त केलेल्या भावनांशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत.
{{तेथील प्रत्येक पाटीवर कन्नड भाषेला प्रथम स्थान होते.}}
आपण नीट निरीक्षण केले तर असे आढळते की महाराष्ट्रातील सर्व स्थानकांवर सहसा हिंदी व इंग्रजीतच पाट्या आढळल्या तरी कर्नाटकाची सीमा जवळ येऊ लागली की (महाराष्ट्रातही) पाट्यांवर कन्नड दिसू लागते. गुजराथ जवळ येऊ लागले की गुजराथी व आंध्र जवळ येऊ लागले की तेलुगू दिसू लागते. अशीच कथा राष्ट्रीय महामार्गावर आढळते. म्हणजे केवळ मराठी माणसांनाच जगाने मूर्ख व स्वाभिमानशून्य म्हणून गृहित धरले आहे.
{{माझे महाराष्ट्र बँकेत खात आहे. परंतु बँकेच्या नावात जरी महाराष्ट्र असला तरी तो खाते पुस्तकावर नाही.}}
खालील लेख वाचलेत का? त्यामधील रिझर्व बॅंकेच्या नियमांचे संदर्भ देऊन सर्व पाट्या, सूचना फलक, माहितीपुस्तके, सर्व फॉर्म इत्यादी मराठीत असण्याबद्दल त्या अमहाराष्ट्र बॅंकेला पत्र का लिहित नाही? माहिती अधिकाराखाली लिहिलेत तर अधिकच उत्तम.
https://amrutmanthan.wordpress.com/2010/04/04/बॅंकिंग-क्षेत्रामधील-भाष/
https://amrutmanthan.wordpress.com/2010/04/13/linguistic-policy-in-banking-sector-a-case-of-complete-neglect-in-maharashtra/
आपण जर पत्राचा खर्डा करून amrutyatri@gmail.com या पत्त्यावर पाठवलात तर आम्हीही आमच्या बुद्धीप्रमाणे मदत करण्याचा प्रयत्न करू.
{{काय करावे तेच कळत नाही.}}
आपण वर्णन केलेले अनुभव हे इतर सर्वांनाही येतच असतात. पण आपल्याप्रमाणेच तेवढ्याच तीव्रतेने किती जणांना खरोखर मनस्ताप, दुःख, चीड, विषाद ह्या भावना अनुभवास येतात? आपल्या इतकीच तळमळ बहुसंख्य मराठी माणसांत असती तर असे सर्व नक्कीच घडले नसते. ज्या बेपर्वाईने, निर्लज्जपणाने, केवळ स्वार्थकेंद्रित वृत्तीने आपले राज्यकर्ते, राजकारणी, सामाजिक नेते, एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील व्यावसायिक, धंदेवाईक, नोकरदारवर्ग वागतात तसे वागण्याची त्यांची हिम्मतच झाली नसती.
तेव्हा केवळ खिन्न होऊन, विषाद मानून उपयोग नाही. आपल्यापैकी प्रत्येक मराठीप्रेमीने (जेवढे शिल्लक असतील त्यांच्यापैकी प्रत्येकाने) आपल्या प्रत्येक कृतीतून आपले मराठी भाषेबद्दलचे, संस्कृती-परंपरा-इतिहासाबद्दलचे प्रेम व अभिमान मोकळेपणाने व्यक्त केला पाहिजे व ह्या विचारांचा आपल्या मित्र-बांधव-नातलग मंडळीत धडाडीने प्रसार केला पाहिजे. प्रत्येक बाबतीत आपण आपल्या कृतीने आपला स्वाभिमान सिद्ध केला पाहिजे. बोलताना, लिहिताना, शक्य तिथे सर्वत्र आग्रहाने मराठीचाच वापर करायला पाहिजे व इतरांनाही तसाच करावा लागण्यासारखी परिस्थिती निर्माण करायला पाहिजे. महाराष्ट्र राज्यात समाजात सर्वत्र मराठी ऐकू, दिसू लागली तर तिचा सन्मान तिला पुन्हा लाभेल व आपण तिला गतवैभव पुन्हा मिळवून देऊ शकू.
मराठी माणसाची मराठी ह्या विषयाबाबत एकजूट झाली तर हे सहजशक्य आहे. तीच साध्य करण्याचाप्रयत्न करू.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
nirlajjya ani kodgya marathi manala shandh ani dilli pudhe marathi chi asmita gahan thevanarya lochat ani paishakarita konachyahi khali zopnarya rajkarnyanni gherle aahe. asha marathi? mansa kadun kay apeksha? satya kadave pan pachani padayalach pahije.
प्रिय श्री० अरविंद मनोहर देशपांडे यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपण म्हणता तशी परिस्थिती आज आहे हे खरे आहे. पण पाऊणशे-शंभर वर्षे व त्या आधी अशी परिस्थिती नव्हती. संपूर्ण भारतात मराठ्यांबद्दल आदरयुक्त वचक असे. लोकमान्य टिळकांबद्दल संपूर्ण राष्ट्राला कौतुकादर होता. पण पुढे आपण हे का घालवले?
आपल्याच समाजाला दूषण देऊन यात सुधारणा तर नक्कीच होणार नाही. आपण प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करून स्वभाषाप्रेम, स्वसंस्कृतिप्रेम, स्वाभिमान या भावनांचा सतत प्रसार करीत राहिले पाहिजे. या विषयावरील अनेक लेख आपल्याला आपल्या या अमृतमंथन अनुदिनीवर (ब्लॉगवर) सापडतील. चाळून पहा. जे आवडतील ते सवडीने संपूर्ण वाचा. खालील लेखांवरून अवश्य दृष्टी फिरवा.
आपले घोषवाक्य आहे – मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…
मराठी संस्कृती व तिच्याच अनुषंगाने भारतीय संस्कृती. सर्व लेख मुख्यतः याच सूत्राला धरून असतात.
आपण ते इतरांनाही अग्रेषित करू शकता.
https://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/
https://amrutmanthan.wordpress.com/2009/11/15/हिंदी-ही-राष्ट्रभाषा-एक-च/
https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/21/एकच-अमोघ-उपाय-मराठी-एकजूट/
https://amrutmanthan.wordpress.com/2010/01/02/हिंदी-ही-भारताची-राष्ट्र/
———————-
खालील दुव्यावरील गांधीजींचा लेख वाचून पहावा.
Mahatma Gandhi’s Thoughts on Medium of Education –} http://wp.me/pzBjo-w8
———————
https://amrutmanthan.wordpress.com/2009/11/09/पालकांनी-चालवलेला-बालकां/
https://amrutmanthan.wordpress.com/2010/07/11/मातृभाषेचं-मानवी-जीवनातल/
Lord Macaulay’s Psychology: The Root Cause behind British India’s Baneful Education System –} http://wp.me/pzBjo-uH
——————-
अमृतमंथनावर असे इतर अनेक लेख आहेत. जेव्हा जेव्हा सवड मिळेल तेव्हा सहज फेरफटका मारावा, लेखांवर दृष्टी टाकावी. स्वारस्य वाटतील ते लेख संपूर्ण वाचावेत, त्याखाली आपली मते नोंदवावीत. आवडलेले लेख मित्रमंडळींना अग्रेषित करावेत. अमृतमंथन परिवाराच्या संस्कृतीत बसणार्याे अधिकाधिक लोकांना जवळ आणणे, त्यांची एकजूट घडवणे हा आपल्या चळवळीचा एक उद्देश आहेच.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट