मोल्स्वर्थकृत मराठी-इंग्रजी शब्दकोश आता सीडी आवृत्तीतून उपलब्ध (वृत्त: दै० महाराष्ट्र टाईम्स)

प्रिय मराठीप्रेमी मित्रांनो,

आजच्या (१५ सप्टेंबर २००९ च्या) म०टा० मध्ये खालील बातमी आली आहे, ती आपल्या माहितीसाठी देत आहे.

————-

“मराठी भाषकांना अत्यंत उपयुक्त असा मोल्स्वर्थकृत मराठी-इंग्रजी शब्दकोश आता सीडी आवृत्तीतून उपलब्ध झाला आहे. मुंबई संगणक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या सीडी आवृत्तीत ६० हजाराहून अधिक मराठी शब्दांचे अर्थ आहेत. सीडीची किंमत केवळ ७५ रुपये आहे. संपर्क: ९९८७६ ४२७९१, ९९८७६ ४२७९९.”

————–

वरील बातमी आपल्याला तिचा दुवा देण्यासाठी म०टा०च्या संस्थळावर शोधली; पण सापडली नाही. (तसं म्हटलं तर चमचमीत, स्फोटक किंवा ’ब्रेकिंग-न्यूज’ नसल्यास हवी असलेली बातमी मराठी वर्तमानपत्रांच्या संस्थळावरून निवडून काढणे हे एक दिव्यच असतं.) म्हणून तिचे टंकन करून (आणि म०टा०च्या शुद्धलेखनाच्या चुका सुधारून) मूळ बातमी आपल्या माहितीसाठी प्रस्तुत केली आहे.

एकोणीसाव्या शतकात मराठी-इंग्रजी शब्दकोशाचे संकलन करण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्यातील फार थोडे पूर्णत्वास पोचून लोकांसमोर आले. जे० टी० मोल्स्वर्थ यांचा हा पावणे दोनशे वर्षांपूर्वी लिहिलेला शब्दकोश म्हणजे अर्वाचीन काळातील जुन्या आणि बृहत्कोश म्हणता येईल अशा मराठी शब्दकोशांपैकी अग्रगण्य मानावा लागेल. त्यामधील बहुतांश शब्द आजही आपण तसेच वापरत असल्यामुळे प्रत्येक मराठी माणसास लिहिण्या-वाचण्या-बोलण्यासाठी हा कोश अत्यंत उपयोगी ठरावा.

शिवाय हा कोश टंकलेखन करून त्याची सॉफ्टकॉपी सीडीवर उपलब्ध करून दिलेली असल्यामुळे आपण दिलेला किल्लीचा शब्द (keyword) ज्याज्या उतार्‍यात आलेला आहे; ते सर्व उतारे आपल्याला संगणकपटलावर दाखवले जातात. (निदान मोल्स्वर्थच्या संकेतस्थळावरील कोशामध्ये तरी तशीच सोय आहे.) त्यामुळे या कोशाचा आपण खालीलप्रमाणे विविध प्रकारे उपयोग करू शकतो.

१. एखाद्या मराठी शब्दाच्या विविध अर्थच्छटांचे इंग्रजीतून अर्थ शोधणे

२. एखाद्या इंग्रजी शब्दासाठी मराठी प्रतिशब्द शोधणे (शब्दकोशाचा उलटा उपयोग)

३. एखादा विशिष्ट शब्द वापरून केलेला वाक्‌प्रचार, म्हण इ० शोधून काढणे

पावणे दोनशे वर्षांपूर्वीच्या काळी मोल्स्वर्थसाहेबांच्या मदतीस दुसरा एखादा नजिकच्या काळातील शब्दकोश उपलब्ध नसतानादेखिल त्यांच्या सारख्या परदेशातून येऊन इथे स्थायिक झालेल्या माणसाने केलेले हे प्रचंड काम अत्यंत कौतुकास्पद तर आहेच पण मराठी भाषेच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याकाळी मराठीतील फारच थोडे साहित्य छापले जात होते आणि वाचले जात होते. भाषा बरीचशी ऐकीव आणि बोलीभाषाच होती. त्यामुळे त्याकाळच्या भाषेत बरेच स्थानिकीकरण व विविधता आढळते. एकच शब्द निरनिराळ्या भागात निरनिराळ्या अर्थच्छटांसाठी वापरला जाई आणि एकाच शब्दाचे उच्चारही थोडेफार वेगळे असत. या कोशावरून वरवर नजर फिरवली तरी अशा अनेक सुरस गोष्टी लक्षात येतात.

थोडक्यात म्हणजे प्रत्येक संगणकसाक्षर मराठीप्रेमी व्यक्तीने जवळ बाळगावा असाच हा (सीडीवरील) कोश आहे.

मोल्स्वर्थ यांच्या संस्थळावरील शब्दकोशाच्या दुव्यासाठी व इतर मराठी कोशांबद्दलच्या माहितीसाठी खालील दुवा पहा.

https://amrutmanthan.wordpress.com/2009/07/22/दुवे-मराठी-भाषा-शब्दकोश-आ/

————————

ता०क० वरील टिपणात वापरलेल्या इंग्रजी शब्दांना मला खालीलप्रमाणे मराठी प्रतिशब्द सुचतात. आपल्याला इतर काही सुचवायचे असतील तर अवश्य कळवा.

breaking news: ताजी बातमी

soft copy: मृदुप्रत (hard copy किंवा hard coding च्या तुलनेत बदल-सुधारणा करण्यास सोपी, (चिकणमातीसारखी) pliable, reshapable  म्हणून soft)

CD (compact disc): अटकर चकती (लहान जागेत खूप माहिती-आशय सामावून घेणारी चकती)

keyword: किल्लीचा शब्द, कळीचा शब्द (किल्लीचा शब्द हा शब्दप्रयोग मी आधी ऐकलेला आहे. अगदी विनोबांच्या ’गीताप्रवचने’ पुस्तकातही तो आढळतो.)

आपल्याला काय वाटतं? आपली मते अवश्य कळवा.

– अमृतयात्री

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s