पुस्तक ओळख – ‘व्हाय नॉट आय?’ (ले० वृंदा भार्गवे)

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

सौ० शुभदा रानडे-पटवर्धन

………

.

व्हाय नॉट आय?

लेखिका: वृंदा भार्गवे

अमेय प्रकाशन, पृष्ठे : २५२, मूल्य : २५० रुपये

सायनला जाताना देवूच्या डोळ्यांना जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून स्टरलाईज्ड गॉज डोळ्यांवर ठेवायचे. त्यावर काळा गॉगल घालायचे. कधी कडेवर घेऊन बसमध्ये, तिथून स्टेशन. मग परत ट्रेन. सायनला उतरून हॉस्पिटलपर्यंत चालणे, आता तिनेही निमूट सा-याची सवय करून घेतली होती.

जखमा ब-या झाल्या आणि तिच्या डोळ्यात एक पडदाही निर्माण झाला. त्या दिवशी सायनला डॉक्टर माधवानींनी तिचे डोळे तपासायला सुरुवात केली आणि देवूने सांगितले, “डॉक्टर, मला काहीच दिसत नाही. खूप सारा अंधार आहे. ”

मी वेड्यासारखी पाहातच राहिले. डॉक्टरांनाही भीती होतीच. एक विलक्षण कातर क्षण होता तो.

माझ्या डोळ्यांसमोर तिचे मोठ्ठाले डोळे, हसणे, व्रात्यपणा सगळं येऊन गेलं. तिनं पाहिलेलं थोडंसं जग, थोडा निसर्ग आणि तिच्या जवळची माणसं आता गुडुप झाली असणार…

डॉक्टर म्हणाले, ” काहीच दिसत नाही?”

“नाही. अंधार आहे. काळं काळं…”

डॉक्टरांनी मला पुन्हा त्यांच्या केबिनमध्ये आणलं. एक ग्लास पाणी दिलं.

“तुम्ही शक्य तितक्या लवकर हैदराबादला जाऊ शकता?”

“हैदराबाद?”

“भारतातलं कॉर्नियावरचं एक उत्तम रुग्णालय आहे तिथं. जाऊ शकाल, म्हणण्यापेक्षा जाच. मी तिथल्या डॉक्टरांशी बोलून ठेवतो. ”

मी केबिनबाहेर पडले. बाहेरच्या बाकावर डोळ्यांवर गॉगल लावलेली माझी देवू बसली होती. कालपर्यंत तिला थोडंफार दिसत होतं. आता तिची दृष्टीच नव्हती. मला केविलवाणं वाटलं. क्षणभर सा-यांचा राग, संताप, नैराश्य दाटून आलं. या चार महिन्यात किती डॉक्टर, केवढे उपचार, किती हॉस्पिटल्समध्ये जाऊन किती खुर्च्यांवर तिला बसवलं. प्रखर लाईटस नी डोळ्यांची तपासणी, तिच्या शरीरावरचे डाग, व्रण, जखमा, डोळ्यांची बुबुळं, पापण्या चिकटू नयेत म्हणून केलेले प्रयोग. हा माझा पोटचा जीव, काय नशिब घेऊन आला आहे? आंधळेपणाचा शाप हिलाच का? आता इथून पुढे ना पाहिलेले हैदराबाद. तिथे पुन्हा डॉक्टर्स. ते काय बोलणार काही कळणार नाही. तेच ऑप्शन्स देणार. आपण कोणाची तरी मदत घेऊन एका ऑप्शनवर टीकमार्क करणार… कदाचित तोच ऑप्शन देवूच्या दृष्टीने घातक असेल. शेवटी कोणालाही आपल्या या मुलीच्या डोळ्यांबद्दल एवढी सहानुभूती वाटण्याचे कारण काय? त्यांच्या दृष्टीने एक पेशंट, एक नवी केस.

मी देवूपाशी गेले. तिला कडेवर घेतले. “ममा, मी चालेन. हां…पण मला आता गाड्या दिसणार नाहीत.”

आवंढा गिळला. चालू लागले.

“ममा, तू बोलत नाहीस. रडतेय?” तिने तिच्या बोटांनी माझ्या चेह-याला स्पर्श केला. तिची बोटं ओली झाली.

“ममा, मी त्रास देणार नाही. शहाण्यासारखी वागेन… तू मला काठी आणून दे.”

रस्त्यावरून मी रडत चालले होते. कशाचीच पर्वा नव्हती. लोकांची…त्यांच्या पाहण्याची…गर्दीची…

—————–

पाणीदार डोळ्याच्या देखण्या मुलीची दृष्टी डॉक्टरांच्या चुकीमुळे गेली. वय होतं सात. त्वचा, दात, केस, वर्ण सगळ्यावर परिणाम झाला. पण तरी या गोष्टीचं निराश समर्थन न करता माणसाचं जगणं अतिसुंदर अनुभव असतो, हेच आग्रहानं सांगणा-या आई-मुलीची ही संघर्ष आणि जिद्दीची प्रेरणादायी कहाणी.

………………………………………………………………………….

प्रिय रसिकांनो,

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. आपल्यालाही हे विचारधन पाठवायला सुरुवात केली आहे.

मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत,

शुभदा रानडे-पटवर्धन

shubhadey@gmail.com

ranshubha@gamil.com

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s