पुस्तक ओळख – स्वरार्थमणी : रागरससिद्धांत (ले० गानसरस्वती किशोरी आमोणकर)

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

सौ० शुभदा रानडे-पटवर्धन

………

स्वरार्थमणी : रागरससिद्धांत

लेखिका: गानसरस्वती किशोरी आमोणकर

राजहंस प्रकाशन, पृष्ठे : १५८, मूल्य : ४०० रुपये

वाणीच्या वा वाद्याच्या माध्यमातून जे स्वरमय साकार होते, व्यक्त होते, ते सारे संगीत या शब्दाने ओळखले जाते. ज्याला आपण संगीत म्हणतो, ती खरे म्हणजे स्वरभाषा आहे. मानवी भावसृष्टीचे म्हणजेच मनोवस्थांचे साक्षात तसेच रमणीय दर्शन घडवणारे सौंदर्यप्रधान गायनवादन हेच रागसंकल्पनेचं अधिष्ठान आहे. स्वरमाध्यमातून व्यक्त होणारी श्रवणप्रधानता आणि तर्कनिष्ठता – म्हणजे विवक्षित रागात ठराविकच स्वर येतात, त्या रागाचा विशिष्ट असा एक मुख्य वादी स्वर असतो इत्यादी विधाने- यांना महत्व असते; ते त्या रागाच्या मूळ स्वरूपाचे तत्व, भाव, आणि शास्त्र जाणून घेण्यासाठी किंवा रागभावाच्या वातावरणाची साधारण कल्पना येण्यासाठी. स्वरभाषा हे जसे शास्त्र आहे, तसेच ते भाव प्रकट करणारे नाट्यही आहे आणि काव्यही आहे. राग म्हणजे तालबद्ध, शब्दबद्ध आणि स्वरबद्ध असलेली बंदीश नव्हे. रागविस्तार किंवा रागदर्शन हे वाद्यावर वाजवल्या जाणा-या कोणत्याही तालाच्या आधाराने मांडलेले स्वरप्रकटीकरण किंवा शब्दबद्ध वा नोटेशनबद्ध केलेले संगीतही नव्हे. मग राग म्हणजे नेमके काय, याचा विचार होणे आवश्यक आहे.

विश्वातील सर्वच स्वरव्यवहार हा स्वर आणि भावार्थ यांच्याच माध्यमातून होत असतो. म्हणून व्यक्त होणा-या अभिव्यक्तीचे शरीर आणि आत्मा या दोहोंच्या संदर्भात होणा-या अभिव्यक्तीचा त्या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे. स्वर आणि अर्थ यांच्या सहिततत्वातून शरीराच्या अस्तित्वाचे अंतर्बाह्य सम्यक ज्ञान प्राप्त होऊ शकते. म्हणूनच रागाच्या आत्म्याचा शोध घेताना त्याच्या वादी, संवादी, अनुवादी, विवादी, पकड, चलन व इतर लक्षणांबरोबरच या लक्षणांहून अधिक सूक्ष्म अशा पूर्वसूरींनी दिलेल्या एकादश लक्षणांचा भावार्थसिद्धतेसाठी विचार करावा लागेल. इथे राग या शब्दाचा व्यापक अर्थ गृहीत धरून रागतत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.

भरतमुनींनी नाट्यशास्त्रात नाट्याच्या संदर्भात काव्याची चर्चा करताना “अर्थ क्रियोपेतम काव्यम” म्हणजे अभिनयाच्या माध्यमातून व्यक्त होणारा सौंदर्यपूर्ण अर्थ म्हणजे काव्य, अशी व्याख्या केली आहे. राग हा निखळ स्वरूपामध्ये, नाट्य स्वरूपामध्ये आणि काव्य स्वरूपामध्ये वेगवेगळी रूपे धारण करत असतो. सर्वसाधारणपणे श्रोत्यांसमोर रागाचे होणारे सादरीकरण हे त्या रागाचे नाट्यस्वरूप असते. तसेच स्वराभिनयाच्या माध्यमातून व्यक्त होणारा सौंदर्यपूर्ण भावार्थ म्हणजे रागकाव्य, अशी रागकाव्याची व्याख्या करता येईल. रागाचे उच्चतम प्रकटीकरण म्हणजे रागकाव्य.  नाटकातील अर्थ अभिनयातून व्यक्त करावयाचा असल्याने नाटकात दृश्यक्रियेला महत्व असते. काव्यामध्ये हाच अभिनय सौंदर्यपूर्ण शब्दार्थातून प्रकट होत असतो. म्हणजेच काव्यात सौंदर्यपूर्ण शब्दार्थाचा अभिनय होत असतो. नाट्यचर्चेचे संक्रमण काव्यचर्चेत झाले आणि दोन्हीचे संक्रमण रागचर्चेत करताना क्रियेची म्हणजेच अभिनयाची जागा आता स्वरांनी घेतली. हा स्वरांनी केलेला अभिनय असतो. म्हणजेच स्वर अभिनीत होत असतात. गायकाच्या किंवा वादकाच्या अंत:करणातील रागभाव श्रोत्यांच्या मनात संक्रमित करणे हेच स्वराभिनयन असते. असा स्वर प्रतिभावंत कलाकाराच्या स्वरव्यापारातून अवतरत असतो आणि त्यामुळे अशा स्वरातून व्यक्त होणारा अर्थ हा केवळ श्रवणार्थ किंवा स्वरार्थ राहात नाही. त्याला रससौंदर्य प्राप्त झालेले असते. रागाचे भावार्थपूर्ण प्रावाहिक सौंदर्यपूर्ण स्वरप्रकटीकरण हे त्या रागाला रसरूप प्राप्त करून देत असते. म्हणूनच राग हा नुसता त्याच्या आरोहावरोहातून वा वादी-संवादी तत्वातून प्रकट होत नसतो. ज्यामुळे रागभाव रसरूप धारण करतो, अशाच स्वरव्यापाराला म्हणजेच रागाला काव्यस्वरूप येत असते. नुसत्याच कंठातील सामर्थ्याला किंवा माध्यमातील कौशल्याला रागरूप म्हणता येणार नाही.

जसा नाट्यशास्त्र आणि काव्यशास्त्र यांचा अभ्यास झाला, चर्चा झाली, तशीच रसप्रचीतीच्या दृष्टीकोनातून रागव्यापाराची चर्चा व्हायला हवी. रसाशिवाय कोणताही अर्थ प्रवर्तित होत नाही, या भरताच्या वाक्याच्या संदर्भात अर्थ म्हणजे रसयुक्त रागार्थ, ही कल्पना स्पष्ट होते. रागगायनातून जर रस प्रतीत होत नसेल तर ती एक आत्मविरहित अशा रागशरीराची अनुभूती असते. आत्म्यासह येणा-या शरीराची प्रचिती ही त्या शरीराच्या चैतन्याची प्रतीती असते. म्हणूनच इथे स्वर आणि अर्थ यांचा आशय किती व्यापक आहे, याची कल्पना येऊ शकेल. कलाकाराच्या प्रातिभस्पर्शाने अपूर्व रूप धारण करून प्रकट होणारा स्वर आणि त्यातून अभिव्यक्त होणारा चमत्कृतीपूर्ण अर्थ म्हणजेच रागार्थाचे साहित्य होय. अशा प्रकारच्या स्वरविश्वातून रागमांडणी करायची असेल तर इथे रागातील स्वरार्थांच्या ठिकाणी असे कोणते वैशिष्ट्य असते की ज्यामुळे साध्या नुसत्या स्वरार्थातून अपूर्व अशा अर्थसौंदर्याचा साक्षात्कार व्हावा? साहित्यातील गुण, औचित्य, अलंकार, रीती, ध्वनी, इत्यादी तत्वे तसेच नाट्यशास्त्रातील विभावानुभवादी तत्वे स्वरभाषेला लावल्याखेरीज रागातून रसप्रचिती येते, हे सिद्ध करता येणार नाही. सह्र्दय रसिकाच्या ठिकाणी भावार्थसौंदर्याची प्रचिती घडवून आणणे, हेच नाट्य आणि काव्याप्रमाणे रागप्रकटीकरणाचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच रागातील स्वरार्थांना रसत्व प्राप्त करून देणा-या स्वरमाध्यामातील निश्चित व्यापाराचा शोध घेणे आवश्यक ठरते.

………………………………………………………………………….

प्रिय रसिकांनो,

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. आपल्यालाही हे विचारधन पाठवायला सुरुवात केली आहे.

मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत,

शुभदा रानडे-पटवर्धन

shubhadey@gmail.com

ranshubha@gamil.com

One thought on “पुस्तक ओळख – स्वरार्थमणी : रागरससिद्धांत (ले० गानसरस्वती किशोरी आमोणकर)

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s