पिठांत मीठ (ले० लोकमान्य टिळक)

लोकमान्यांनी हा लेख लिहून शंभराहून अधिक वर्षे होऊन गेली. टिळकांचा काही आशावाद काळाने चुकीचा ठरवला; त्याचप्रमाणे काही निराशावादही काही प्रमाणात अनाठायी होता असे काळाने सिद्ध केले. बर्‍याच प्रश्नांना उत्तरे फक्त काळच देऊ शकतो हेच खरे!

आपले पुण्याचे मित्र श्री० विजय पाध्ये (भाषांतरकार, त्यांच्या स्वतःच्या शब्दांत – wordsmith) यांनी पाठवलेला लोकमान्य टिळकांनी सन १९०५ साली ’केसरी’मध्ये लिहिलेल्या एका लेखातील काही अंश पहा.

“……मराठी भाषेंत नवीन उद्योगधंद्यासंबंधीं शब्द सर्व इंग्रजींतील जसेच्या तसेच घेतां यावयाचें नाहींत; आणि सर्व मराठी किंवा संस्कृतवरून मराठींत नवीन बनवितां यावयाचे नाहींत. या दोन्ही गोष्टी तात्त्विकदृष्ट्या खर्‍या आहेत. प्रत्येक बाबतींत ज्याप्रमाणें तारतम्य लागतें त्याप्रमाणें येथेंहि तें पाहिजे. बुक, स्लेट, पेन्सिल यांबद्दल नवीन संस्कृत शब्दांचा उपयोग करणें आतां कठिण आहे. परंतु तेवढ्यामुळें मराठी कोशांत सदर इंग्रजी शब्दांस शुद्ध संस्कृत किंवा शुद्ध मराठी पर्याय देऊं नयेत अथवा दिले असतां ती चूक आहे, असें मात्र आम्हांस वाटत नाहीं. परकीय राज्यांत राज्यकर्त्यांच्या परकीय भाषेंतील शब्दांचा भरणा कसा होतो, हें मराठी बखरींची भाषा वाचली असतां कोणासहि समजण्यासारखें आहे. अद्यापहि निजामशाहींत मराठी भाषा बोलणारे जे लोक आहेत त्यांच्या भाषेंत उर्दू शब्दांचा अधिक भरणा असतो. स्वभाषेंत आलेल्या या परकीय शब्दांपैकीं बरेच परकीय राज्याबरोबरच नाहींसे होतात असाहि अनुभव आहे. कारण परकीय राज्य नाहींसें झाल्याबरोबर परकी भाषा शिकण्याचें लोक अर्थातच सोडून देतात; आणि मग परकी शब्द – जे अत्यंत रूढ झाले असतील ते सोडून – भाषेंतून आपोआप नाहींसे होतात. मराठींत फारशी शब्दांची ही स्थिति झाली आहे व इंग्रजी शब्दांचीहि केव्हां ना केव्हां अशीच व्हावयाची आहे. शास्त्रीय शब्द किंवा व्यवहारोपयोगी दुसरे शब्द स्वभाषेंतलेच असावे हें तत्त्व पूर्वींच्या लोकांसहि माहित होतें, असे (शिवाजी महाराजांनी मुद्दाम करवून घेतलेल्या) राज्यव्यवहार-कोशावरून दिसतें. परकी भाषेंतील शब्द मुळींच घेऊं नयेत असें आमचें मत नाहीं. पण ते पिठांतमीठया न्यायानें घेतले तरच स्वभाषेस पथ्यकर व रुचकर होतात, नाहींपेक्षा सर्व भाकरी खारट होऊन जाते!…..”

बाळ गंगाधर टिळक

(स्फुट सूचना, ‘केसरी’, दि० ४ जुलै १९०५)

>>>>>>>>>><<<<<<<<<<

लोकमान्यांनी हा लेख लिहून शंभराहून अधिक वर्षे होऊन गेली. टिळकांचा काही आशावाद काळाने चुकीचा ठरवला; त्याचप्रमाणे काही निराशावादही काही प्रमाणात अनाठायी होता असे काळाने सिद्ध केले. बर्‍याच प्रश्नांना उत्तरे फक्त काळच देऊ शकतो हेच खरे. उदाहरणार्थ:

टिळक म्हणतात: बुक, स्लेट, पेन्सिल यांबद्दल नवीन संस्कृत शब्दांचा उपयोग करणें आतां कठिण आहे.

अमृतयात्री: पुस्तक, पाटी हे शब्द आपण बालपणापासूनच बुक, स्लेट हे शब्द कानावर पडण्यापूर्वीपासूनच ऐकत आलो कारण मराठीत ते केव्हाच व्यवस्थितपणे प्रस्थापित/प्रचलित झाले आहेत. अर्थात पेन्सिल, टेबल, बस, टॅक्सी असे इंग्रजी शब्द आपण त्यांच्या मूळ संकल्पनांसह जसेच्या तसे स्वीकारले आहेत. पण त्याबरोबर आपण हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे की इंग्रजी राजवटीमुळे आपण नवीनच शिकलेल्या कित्येक संकल्पनांच्या संबंधित इंग्रजी शब्दांनासुद्धा आपण मराठीमध्ये खासदार, आमदार, वाचनालय, शास्त्रज्ञ, मुख्यमंत्री, अभ्यासक्रम, सार्वजनिक, रौप्यमहोत्सव, जयंती, पुण्यतिथी, दूरदर्शन, आकाशवाणी, चित्रपट, मध्यांतर, रंगमंच, प्रेक्षक, प्रशस्तिपत्र, प्रमाणपत्र, महापौर, हुतात्मा, स्थायी समिती, महामंडळ, लोकसभा, विधानसभा, घटना, संसद, संचारबंदी, अश्रूधूर, व्यक्तिमत्व, व्यंगचित्र, क्रीडांगण, आयुक्त, तथाकथित, स्वतः, इत्यादी (हासुद्धा नवीनच शब्द), इत्यादी अनेक प्रतिशब्द असे व्यवस्थित रूढ केले गेले आहेत की ते एकेकाळी मराठीत नव्हतेच यावर विश्वासच न बसावा. यातील अनेक शब्द कालांतराने इतर भारतीय भाषांनीसुद्धा आत्मसात केले. आता पुन्हा हिंदीप्रमाणे आपण बुक, स्कूल (इस्कूल?), इ० मराठीतून हुसकावून बाहेर काढलेले इंग्रजी शब्द पुन्हा मागील दाराने आत आणले तर आपल्यासारखे मूर्ख आपणच.

>>>>><<<<<

टिळक: स्वभाषेंत आलेल्या या परकीय शब्दांपैकीं बरेच परकीय राज्याबरोबरच नाहींसे होतात असाहि अनुभव आहे. कारण परकीय राज्य नाहींसें झाल्याबरोबर परकी भाषा शिकण्याचें लोक अर्थातच सोडून देतात; आणि मग परकी शब्द – जे अत्यंत रूढ झाले असतील ते सोडून – भाषेंतून आपोआप नाहींसे होतात. मराठींत फारशी शब्दांची ही स्थिति झाली आहे व इंग्रजी शब्दांचीहि केव्हां ना केव्हां अशीच व्हावयाची आहे.

अमृतयात्री: स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दोन-तीन दशकात जरी सामान्यजनात स्वदेशप्रेमाबरोबरच स्वभाषेबद्दलचा अभिमान टिकून होता. त्याकाळच्या बर्‍याच (स्वातंत्र्य लढ्याची झिंग अद्याप न उतरलेल्या) लेखक, कवी, आदर्शवादी समाजकारणी व राजकारण्यांनी देखिल हा स्वभाषाभिमान जोपासला आणि शक्य तितके त्यास खतपाणीही घातले. त्याकाळी नवनवीन परकी शब्दांना चपखल प्रतिशब्द शोधून काढण्याच्या बाबतीत विद्वानांत अहमहमिका लागली असे. परंतु  सद्यस्थिती पाहता टिळकांचा ह्या विषयीचा आशावाद मात्र पूर्णपणे चुकीचा ठरतो आहे की काय असे वाटते. आणि याला कारण म्हणजे त्यांनी मांडलेला सिद्धांत चुकला असे नव्हे तर त्यांचे (भारतीय आणि विशेषतः मराठी माणसाच्या स्वभावाविषयीचे) मूळ गृहीतच चुकले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे स्वातंत्र्य मिळाले व इंग्रजांचे दास्यत्व आपण संपुष्टात आणले; एवढेच नव्हे तर स्वातंत्रोत्तर काळात स्थानिक भाषांच्या उत्कर्षासाठी भाषावार प्रांतरचनेचे तत्वही आपण स्वीकारले. मग तर टिळकांचे प्रमेय लागू होऊन आत्तापर्यंत मराठीच्या भाकरीत पिठासोबत फक्त चवीपुरतेच मीठ शिल्लक राहिले पाहिजे होते. पण जे जपानी, इस्रायली अशी माणसे करू शकली ते आपण करू शकलो नाही. याचे कारण म्हणजे त्यांच्या मानाने तोकडा पडणारा आपला भाषाभिमान. इतर जगातील ज्ञानाशी जोडणारा सेतु म्हणून इंग्रजीचे व्यवस्थित ज्ञान अवश्य असावेच; परंतु त्याचे स्तोम माजवण्याचे कारण नाही. आणि इंग्रजीच्या ज्ञानाबरोबरच मातृभाषेची जोपासना आणि संवर्धन साधून व  अधिकाधिक आधुनिक ज्ञान-विज्ञान मातृभाषेत आणून ते बहुजनसमाजाला त्यांच्या उंबरठ्यापर्यंत पोचवून द्यायला पाहिजे हे आपण विसरलो. शिवाय स्वातंत्र्यानंतरही आपली गुलामगिरीची वृत्ती न गेल्यामुळे जरी आपले फक्त मालक/साहेब लोक बदलले व स्वातंत्र्यानंतर आपण इंग्रजांचे सांस्कृतिक वंशज आणि दिल्लीचे राज्य ज्यांच्या बहुमतामुळे चालते त्या राज्यांतील राजकारणी यांच्याकडे आपला स्वाभिमान गहाण ठेवला. सांस्कृतिक आणि भाषिक दोन्ही बाबतीत आपण निरभिमानी आणि उदासीन असतो. स्वतःच्या मायबोलीत उघडपणे बोलण्याची आपल्याला लाज वाटते. आणि त्याबद्दल पारितोषिक म्हणून आपल्याला हेटाळणी, आपल्या भाषेला आणि संस्कृतीला आपल्याच राज्यात दुय्यम किंवा तिय्यम स्थान, अशी वागणूक मिळत आली आहे. इतर सर्व राज्यात रेल-वे, टपाल खाते, बॅंका इत्यादी ठिकाणी स्थानिक भाषेला अग्रस्थान असते (अगदी तमिळ बहुल बंगळूरू शहरातसुद्धा), तर फक्त महाराष्ट्रातच स्थानिक भाषेला पूर्णपणे गचांडी दिली जाते आणि इंग्रजी व हिंदीला आमच्या डोक्यावर बसवले जाते. अर्थात याला मुख्यतः आपली निरभिमानी आणि न्यूनगंडग्रस्त वृत्तीच कारणीभूत आहे. आपल्याला आपल्या भाषेच्या आणि संस्कृतीच्या हेटाळणीबद्दल काहीच खंत-खेद न वाटता उलट आपण हिंदी आणि इंग्रजीची मिरी आनंदात आपल्या डोक्यावर वाटून घेतो. आपला असा स्वभाव ओळखून मणिशंकर अय्यर सारखे सामान्य राजकारणी नेतेसुद्धा सावरकरांबद्दलचा अंदमानातील लेख काढून टाकणे अशी कृती मराठी माणसांच्या बाबतीतच करू शकतात. अशा प्रकारे ह्या बाबतीत टिळकांचे मूळ मानसशास्त्रीय गृहीत चुकल्यामुळे त्यांच्यासारख्या विद्वान गणितज्ञाच्या गणिताचे उत्तरही चुकले असावे असे मला वाटते.

>>>>><<<<<

टिळक: शास्त्रीय शब्द किंवा व्यवहारोपयोगी दुसरे शब्द स्वभाषेंतलेच असावे हें तत्त्व पूर्वींच्या लोकांसहि माहित होतें, असे (शिवाजी महाराजांनी मुद्दाम करवून घेतलेल्या) राज्यव्यवहार-कोशावरून दिसतें. परकी भाषेंतील शब्द मुळींच घेऊं नयेत असें आमचें मत नाहीं. पण तेपिठांतमीठयान्यायानें घेतले तरच स्वभाषेस पथ्यकर व रुचकर होतात,नाहींपेक्षा सर्व भाकरी खारट होऊन जाते !

अमृतयात्री: टिळकांचे म्हणणे पूर्णत: सत्य आहे; तसेच अत्यंत महत्वाचेही आहे. आधी लिहिल्याप्रमाणे आपण पिठात व मिठातच गल्लत केलेली आहे. त्यामुळे चिमूटभर पिठात बचकाभर मीठ घालून आपण भाकरी (आजच्या शहरातील संस्कृतीनुसार तंदूर रोटी म्हणावे काय?) बनवितो.  पण आता ही परिस्थिती सुधारण्यासाठी धीर न सोडता आपल्यापैकी प्रत्येकाने पीठ आणि मिठातील फरक ओळखून ही परिस्थिती बदलण्यास शक्य तितका हातभार लावायला पाहिजे.

– अमृतयात्री
(कृपया आपल्या प्रतिक्रिया amrutyatri@gmail.com या पत्त्यावर अवश्य पाठवा. आभारी आहोत.)
.
Tags: , , , , , , , , ,, , , , ,

14 thoughts on “पिठांत मीठ (ले० लोकमान्य टिळक)

  • प्रिय श्री० श्रीहरी गोडबोले यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या प्रतिमताबद्दल आभार. आजकाल “माझी डॉटर मराठी वर्डस्‌ लर्न करायला व्हेरी डिफिकल्ट फाईंड करते” अशा प्रकारचे मराठी बोलण्यात प्रतिष्ठा मानली जाते. अर्थात अशी वाक्ये मराठी तरी का म्हणावीत हे समजू शकत नाही. पण आजकालची वर्तमानपत्रे, दूरदर्शन व इतर माध्यमे ही ह्यात काही सुधारणा करण्यापेक्षा साधेसाधे शब्दसुद्धा हिंदी-इंग्रजी धाटणीचे वापरून मराठीची वाट लावण्यात पुढाकार घेतात. अगदी शेवटपर्यंत आपल्या घरच्या संस्काराप्रमाणे कटाक्षाने ’धन्यवाद’ असे म्हणणार्‍या मुग्धा वैशंपायनलासुद्धा शेवटी ’सारेगमप’वरील धेडगुजर्‍या मराठीच्या मार्‍याने “थॅंक्यू” म्हणायला लावलेच की !!

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 1. ‘pustak’ is a persian word, isn’t it? Sanskrit Bharti has not yet been able to find a synonym for the English words like ‘bus’ and ‘rail’ in pure Sanskrit and the hybrid words like ‘bus yaan’ for the English ‘bus’ and ‘rail yaan’ for the English ‘train’ is used. I think, a pure Sanskrit equivalent could be possible for all the scientific and technological terms in English and even if they are bombastic and unsuitable to use in their complete form their short-forms could very well be used in Sanskrit. In English too many short-forms are commonly used like TV, Fax etc.

  • प्रिय श्री० विपिन मुसळे यांसी,

   सप्रेम नमस्कार.
    
   आपल्या अभ्यासपूर्ण प्रतिमताबद्दल (feedback) अत्यंत आभारी आहोत. बर्‍याच दिवसांनी पुन्हा अमृतमंथनाच्या चर्चापीठामध्ये सहभागी झाला आहात. स्वागत.

   पुस्तक या शब्दाची नक्की व्युत्पत्ती ठाऊक नाही. आपटेंच्या संस्कृतकोशात तो शब्द आहे. मोल्स्वर्थ यांनी तो शब्द मूळ संस्कृत आहे असेच दाखवले आहे. कृ० पां० कुलकर्ण्यांच्या व्युत्पत्तीकोशात तो शब्द दाविडी पुसु, पुस्त या शब्दांपासून तयार झाला अशी नोंद आहे. पण नक्की काहीच कळत नाही.

   टिळकांच्या वरील लेखात सांगितल्याप्रमाणे अपवाद म्हणून काही शब्द ’पिठांत मीठ’ या न्यायाने स्वीकारायला हरकत नाही. तसेच बस, टेबल, डॉक्टर असे शब्द आपण स्वीकारले आहेत.

   आपण म्हणता ते खरेच आहे. शब्दांचा एक गुणधर्म मित्राप्रमाणे आहे. एखादा शब्द नवीन असताना विचित्र, परका वाटतही असेल. पण नित्यवापराने तो ओळखीचा, आपलासा, जवळचा वाटू लागतो. आपण इंग्रजी शब्दच ऐकत राहतो आणि मग मराठी शब्द कधीतरी ऐकला की तो परका, बोजड, विचित्र वाटतो. उदा० आम्हा इंग्रजीप्रचूर भाषा ऐकण्याची सवय असणार्‍या शहरी मंडळींना ’डिस्ट्रिब्यूशन’ हा शब्द ’वितरण’, वाटप’ ह्या शब्दांपेक्षा हलकाफुलका, सोपा, जवळचा (?) वाटतो. त्याचप्रमाणे ट्रकिया, ईसोफेगस, एक्झिक्यूशन, गायनॅकॉलॉजिस्ट, पॉस्च्यूमस, डायाबीटिस, असे शब्द श्वासनलिका, अन्ननलिका, कार्यवाही, स्त्रीरोगतज्ज्ञ, मरणोत्तर, मधुमेह ह्यांच्यापेक्षा अधिक चांगले वाटतात, नाही का? ते खरोखरच अर्थवाही आहेत का? हलकेफुलके आहेत का? (स्पेलिंगचा चक्रव्यूह तर बाजूलाच ठेवू.) शेवटी ऐकून ऐकूनच ते जिवलग होतात व अंगवळणी (कानवळणी) पडतात व त्यामुळेच ही सर्व मानसिकता बनते.

   मध्यंतरी राईलकर सरांच्या एका लेखात वाचल्याप्रमाणे जपानी भाषेतही इंग्रजी शब्दांना धडाधड प्रतिशब्द निर्माण करतात व वापरू लागतात. प्लॅटफॉर्मला ते म्हणतात – चढ-उतार-स्थान. त्यांनी शब्द असे सोपे केले आहेत की सामान्य माणसांना सहज कळावेत.

   पूर्वी अनेक वर्षे रेल्वे’ला आगगाडी हा शब्द आम्ही सर्रास वापरत होतो. तेव्हा तो कधीच खुळचट वाटला नाही. बालपणापासून अग्निरथ हा शब्द ऐकला तर तोही योग्य वाटला असता. एक उदाहरण सांगतो. लहानपणी आम्ही omelette ला ’अंड्याचा पोळा’ किंवा ’आमलेट’ असे म्हणत असू. जरा मोठे झाल्यावर मूळ इंग्रजी शब्द ऑमलेट असा आहे हे समजले तेव्हा तो शब्द कसातरीच वाटला. ऑमलेट’पेक्षा आमलेट हाच शब्द बरा आहे असेही वाटले. नेहमी नळाला णळ म्हणणार्‍याला तोच शब्द योग्य वाटतो. नळ हा शब्द जेवढा शुद्ध मराठी आहे असे आपल्याला वाटते तेवढाच णळ हा शब्द शुद्ध आहे असे त्याला वाटते. त्याला अयोग्य असेही म्हणावेसे वाटत नाही. कारण त्यात वैश्विक सत्य वगैरे काहीच नाही, साधा सवयीचा, सरावाचा प्रश्न आहे. भारतातील माणसाला डाव्या बाजूने गाडी चालवण्याची सवय असते. तो अमेरिकेत गेल्यावर त्याला काही दिवस विचित्र वाटणारच. अशा अनेक गोष्टी प्रथम त्याला खटकतात. नंतर काही वर्षे (किंवा जेमतेम काही महिनेदेखील) अमेरिकेत वास्तव्य झाल्यावर तोच भारतीय माणूस “आमच्या अमेरिकेत यू नो, वुई ड्राईव्ह ऑन दी राईट साईड ऍण्ड हेन्स मी इंडियात आल्यावर आय गेट ऍब्सोल्यूटली कनफाऊंडेड बिकॉज ऑफ दी फनी सिस्टिम हियर इन दिस कण्ट्री” असे म्हणायला कमी करत नाही.

   म्हणूनच स्वभाषेतील शब्द जुनाट व विचित्र वाटण्यामागे ’सवय नसणे’ हेच एकमेव कारण आहे असे आम्हाला वाटते. अर्थात हे मत भारतातील बर्‍याच मंडळींना पटणार नाही ह्याची आम्हाला कल्पना आहे.
    
   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

   • ओळख ठेवल्याबद्दल धन्यवाद! मी सध्या उ. पू. ऑफ्रिकेत काम करतो . इथले लोक त्यांची स्थानिक भाषा शिकून घ्या; फार काळ आम्ही तुम्हाला इंग्रजीचा आधार घेऊ देणार नाही असे आम्हा भारतीयांना ठणकावून सांगतात. वास्तविक आम्ही भारतीय आमच्या फायद्यापेक्षा स्थानिक लोकांच्या फायद्यासाठीच इथे काम करतो. असो! माझ्या प्रतिमतातून मला सुचवायचे होते की एखाद्या इंग्रजी शास्त्रीय/तांत्रिक शब्दाचे मराठीकरण जर बोजड वा संस्कृतप्रचुर होणे जर अनिवार्य असेल तर ते न टाळता त्याच्या तोकड्या स्वरूपाचा वापर करणे शक्य आहे. उदा. बस, ट्रेन या इंग्रजी शब्दांचे संस्कृत भारती बस यान व रेल यान असे संमिस्र भाषांतर करते. समजा इंग्रजी बसचे सार्वजनिक बहुजन समावेशक साधरण मर्गिय यान व ट्रेनचे सार्वजनिक बहुजन समावेशक लोह मर्गिय यान असे होत असेल तर त्यांचा तोकड्या स्वरूपात साबसा यान व साबलो यान असा करणे (संपूर्ण माहित असण्याची जबाबदारी वापरणार्यावर ठेवून) शक्य आहे

    • प्रिय श्री० विपिन मुसळे यांसी,

     सप्रेम नमस्कार.

     {{इथले लोक त्यांची स्थानिक भाषा शिकून घ्या; फार काळ आम्ही तुम्हाला इंग्रजीचा आधार घेऊ देणार नाही असे आम्हा भारतीयांना ठणकावून सांगतात.}}
     ही आपण चांगलीच माहिती दिलीत. जगातील प्रगतच नव्हे तर प्रगतीशील व अप्रगत देशांतही मोठ्या प्रमाणात स्वाभिमान, स्वभाषाभिमान दिसून येतो आणि तो भारतातून मात्र लोप पावत चालला आहे.
     आपले वरील वाक्य हे इंग्रजीतील indirest speach च्या प्रभावामुळे मराठीच्या दृष्टीने चुकीचे झाले आहे. मराठीप्रमाणे ते वाक्य असे हवे:
     {{इथले लोक “त्यांची आमची स्थानिक भाषा शिकून घ्या; फार काळ आम्ही तुम्हाला इंग्रजीचा आधार घेऊ देणार नाही” असे आम्हा भारतीयांना ठणकावून सांगतात. }}

     उत्तर-पूर्व हा शब्द म्हणजे इंग्रजीमध्ये फक्त चारच दिशा असल्यामुले त्यांच्या पंगुत्वाची हिंदी मंडळींनी व हिंदीजनांची आपण केलेली आंधळी नक्कल. संस्कृतप्रमाणे मराठीतही दहा (त्रिमिती – three dimensional view) दिशा आहेत. पूर्व-पश्चिम-दक्षिण-उत्तर-आग्नेय-नैऋत्य-वायव्य-ईशान्य-उर्ध्व-अध. हिंदीतील बुद्दूंना इंग्रजांचे अंधानुकरण करू देत. आपण तसे करण्याचे कारण नाही.

     आपण मराठी भाषेच्या अभ्यासाबद्दल, भाषाशास्त्राबद्दल, शब्दार्थांबद्दल (उदा० आपंगिता) चर्चा करीत आहोत म्हणून हे लिहिले. गैरसमज करून घेऊ नये. इंग्रजी व हिंदीच्या अतिरिक्त प्रभावामुळे आपण आपली भाषाही इंग्रजी वा हिंदीच्या धाटणीने लिहितो. आपण खालील लेख वाचलात का?

     हिंदी वाक्यम् प्रमाणम् ! (ले० सलील कुळकर्णी) –} http://wp.me/pzBjo-BF

     टिळक, सावरकर व त्यांच्यासारख्या इतर स्वाभिमानी, जिद्दी, विद्वानांसारखी मंडळी आज अर्तित्वात नाहीत हेच आपले दुर्दैव.

     क०लो०अ०

     – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० विपिन मुसळे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   अपंग हा अपांग ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. अपांग = (संस्कृत: अप+अंग) अवयवात किंवा इंद्रियात व्यंग, खोडी असलेला; विकलांग; wanting or deformed in some limb or member; उदा० आंधळा, बहिरा, लंगडा.

   ह्यात exactly opposite sense असे काही दिसत नाही. अपरोक्ष या शब्दाच्या बाबतीत मात्र तसे आहे.
    
   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 2. “ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो ह्रूदयी” हे संत तुकाराम महाराजांच्या अभंगातीलच एक वचन आहे. अपंग म्हणजे धडधाकट, ज्ाला कसलेही पंगत्व नाही असा असे आम्ही शाळेत शिकलो.

  • प्रिय श्री० विपिन मुसळे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   हा तर आपण गुगली चेंडूच टाकलात. आमच्या आधीच्या उत्तरावर हा प्रश्न अगदी बेरका आहे. असो. आपल्या परीने चेंडू तटवण्याचा प्रयत्न करतो.

   ह्या संशयाचे निराकरण करण्यासाठी आपल्याला काही प्रमाणित मराठी शब्दकोशांचा आधार घ्यावा लागेल. खालील शब्दार्थ पहा. अपंगिता हा शब्द म्हणजे आपंगिता या शब्दाचे अपभ्रष्ट रूप.

   आपंगणे = १. आपलेसे म्हणणे; आश्रय देणे; प्रेमाने वाढवणे; सांभाळ करणे; सांभाळणे; पोसणे; bring up; foster; rear; support;
   उदा० “याचे आईबाप हा लहान असतानाच मेले; तेव्हा आम्ही याला आजपर्यंत आपंगले. “जे जे शरण आले । ते ते आपंगिले । पवाडे विठ्ठले । ऐसे तुझे ॥” (तुकाराम गाथा-१६३६). “आपंगिले मज श्रीराम समर्थे” (दासविश्रामधाम-३६२).
   २. अंगीकारणे; आपलेसे म्हणणे; स्वीकारणे; take as one’s own; adopt;
   उदा० “मग येथ अथवा स्वर्गी । जेथ जे देह आपंगी” (ज्ञानेश्वरी-१५.३६८). शरणागता कैंचा झालासी निष्ठुर | आपुले किंकर ॥ आपंगावे.

   आपंगिता = आपंगणारा; आश्रयदाता; संभाळणारा; पोसणारा; पोशिंदा;
   उदा० “ज्यासी आपंगिता नाही । त्यासी धरी जो हृदयी ॥” (तुका० गाथा-२२१५)

   अपंगणे, अपंगिता हे अनुक्रमे आपंगणे, अपंगिता या शब्दांचे अपभ्रंश होत.

   अशी उत्तम, विद्वत्तापूर्ण, युक्तिपूर्ण शंका मांडून आमच्याही ज्ञानात भर घातल्याबद्दल अत्यंत आभारी आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 3. lekh aavadla.
  aapan sadhya sadhya shabdansathi swatach pratishabda suchvavayala havet.chuk-barobar nantarchi goshta; suruwat tar karu yaa….
  aamhi tar aata “facebook”la “mukhpustika”cha
  mhanto
  (mukhpustikechya barshyala kalavana zala nahi, tyabaddal kshamaswa)

  • प्रिय श्री० कल्पेश कोठाळे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले मत अगदी योग्य आहे. असलेले आणि विस्मृतीत गेलेले, तसेच नवीन योग्य, चपखल मराठी शब्द सुचवण्याचे आणि स्वतः कसोशीने वापरण्याचे काम प्रत्येकाने आपापल्या परीने केलेच पाहिजे. अमृतमंथनावरही तसे एखादे सदर सुरू करण्याबद्दल आपल्याला काय वाटते? त्याला कसा प्रतिसाद मिळेल? की वादच अधिक होतील?

   अशाच विषयावरील खालील लेख आपण वाचला आहे काय? अवश्य वाचून पहा आणि आपले प्रतिमत (feedback) कळवा.

   हिंदी वाक्यम् प्रमाणम् ! (ले० सलील कुळकर्णी) –} http://wp.me/pzBjo-BF

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s