निवृत्त न्यायाधीश आणि ज्येष्ठ विचारवंत श्री० चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या ’महाराष्ट्र टाईम्स’मध्ये महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या एका अत्यंत वाचनीय लेखातील काही भाग आपल्या वाचनासाठी टाचला आहे.
.
धर्माधिकारींनी लिहिलेल्या प्रत्येक वाक्यामागे असलेले त्यांचे खोल विचार, तसेच समाजातील दुर्भागी आणि पीडित लोकांबद्दल त्यांना वाटणारी कणव व गेल्या पन्नास वर्षांत अशा लोकांचे दुःख आणि गैरसोई कमी करण्यास पूर्णपणे अपयशी ठरलेले राजकारणी आणि राज्यकर्ते यांच्याबद्दलची चीडसुद्धा स्पष्टपणे दिसून येते.
.
लेख वाचल्यावर आपले मन आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. लेखात नमूद केलेल्या प्रत्येक प्रकारच्या दुर्दशेला आपणच सर्व कारणीभूत नाही का? त्यात चर्चिलेल्या प्रश्नांपैकी एकही प्रश्न अमेरिका, चीन, पाकिस्तान किंवा कर्नाटक, उत्तर प्रदेश व बिहारने निर्माण केलेला नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक समस्येस आपण महाराष्ट्रीय मंडळीच बर्याच प्रमाणात सामुहिकरित्या व काही प्रमाणात व्यक्तिशः जबाबदार आहोत हे आपण नीट समजावून घेतले पाहिजे आणि त्या चुका सुधारण्याच्या दृष्टीने पावले उचलली पाहिजेत.
.
धर्माधिकारींच्या लेखातील काही वेचे:
.
महाराष्ट्राची निर्मिती झाली तीच मुळी सामान्य लोकांचा शासन व्यवहारात सहभाग वाढावा म्हणून. लोकभाषेत कारभार चालला तर लोकांची सहभागिता वाटते ही भाषावार प्रांतरचनेची भूमिका. आज तर सुविद्य घरांमध्ये मराठी ही ‘मातृभाषा’च उरलेली नाही. मातृभाषेत आजीआजोबांना पत्र लिहू शकतील, असे नातू नाहीत तर दुसरीकडे नातवांना आंबे खायला मिळावेत म्हणून आंब्याची रोपे लावणारे आजीआजोबा नाहीत. सारे ‘हायब्रीड’वाले आहेत……
.
शासन, विधानसभा व न्यायालय यांची भाषा मराठी नाही. सारे काही सामान्य माणसाला कळणार नाही, अशा भाषेत व अशा पद्धतीने चालले आहे. म्हणून आता खरा प्रश्न हा आहे सर्व मराठी बोलणार्या माणसांचा संयुक्त महाराष्ट्र झाला आहे काय?…….
.
हा जिल्हा नक्षलवादाने ग्रस्त आहे. तेथे होणार्या हत्या आणि नक्षलवाद्यांचा हैदोस यांचा मुकाबला करण्याची मानसिकता दिसत नाही. कारण शेवटी मरतात ते गरीब आदिवासी व शहीद होतात ते पुलिस! त्याची आच नेत्यांना व प्रस्थापितांना लागत नाही. आदिवासी हा दुय्यम नागरिक मानला जातो. जणू त्यांचा जन्म प्रस्थापितांना शोषण करता यावे; म्हणूनच आहे…….
.
याउलट शेतकर्याचे सारे गृहोद्योग व ग्रामोद्योग नष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे बळीराजा सर्वस्वी सरकारधार्जिणा झाला. सावकारांना शरण गेला. शेवटी त्याने आत्महत्या केल्या. संपूर्ण समाजाने जणू शेतकर्याच्या विरोधात कारस्थान केले आहे. सर्वांना पगारवाढ हवी आहे व सर्व मिळून एकमुखी मागणी करतात की धान्याचे भाव कमी झाले पाहिजे. अन्य वस्तूंचे भाव किसानासाठीही वाढले. मात्र, त्याच्या उत्पादनाला उचित भाव नाही…..
.
चंद्रशेखर धर्माधिकार्यांचा लेखांश खालील दुव्यावर उपलब्ध आहे, तो वाचावा.
.
.
काही महिन्यांपूर्वी टिंग्या हा शेतकर्यांच्या प्रश्नांना वाहिलेला मराठी चित्रपट पाहिला. आमच्या शहरी डोळ्यात झणझणीत अंजन घालायचे काम त्या चित्रपटाने केले. हा चित्रपट आमच्यासारख्या सुस्थित आणि सुखलोलुप शहरी लोकांची मुंबई-पुण्यासारख्या शहरांपासून जणु जगाच्या दुसर्या टोकाला असणार्या अप्रगत भागातील दुर्भागी शेतकर्याच्या पराधीन आणि विदारक आयुष्याशी नीट रुजवात घालून देतो. त्याच्या पार्श्वभूमीवर हा लेख अधिकच हृदयस्पर्शी वाटला. आपणही तो चित्रपट अवश्य पहावा अशी आग्रहाची विनंती.
– अमृतयात्री
(कृपया आपल्या प्रतिक्रिया amrutyatri@gmail.com या पत्त्यावर अवश्य पाठवा. आभारी आहोत.)
नमस्कार,
हा लेख चढवून एक वर्ष झाला आहे. हल्ली सर्वाधिक वाचले गेलेल्या लेखांत उल्लेख असूनही यावर काहीच मंथन झालेले दिसत नाही.महाराष्ट्र काय होता? संयुक्त महाराष्ट्र समितीचे चळवळ, चिं. देशमुखांचे पदत्याग करून पंतप्रधानांवर घातलेले दबाव, १०५ हुतात्म्यांचे बलिदान, अजून कित्येक प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष प्रयत्नांचे फळ म्हणून लाभलेला महाराष्ट्र आज सुवर्ण महोत्सवी संपवून काय झाला? कुठे पोचला? या भूभागातील लोक परस्परांच्या सुखदुःखात सहभागी झाले आहेत का? मान्यवर धर्माधिकारींच्या प्रश्नांचे उत्तरच जणू कुणा कडे नाही. अजून काय मिळाले नाही यावर रडणे चालूच असते (बेळगांव, कारवाड, निपाणी आणी गोवा पण?). मिळाले ते तरी विकसित करून भावनिक ऐक्य जोपासले असते तर आम्हाला महाराष्ट्रापासून वेगळे व्हायचे हे ऐकण्यावर आले नसते.
पायांत चपला नसल्या तरी डोक्यावर घालायला टोपी घे असे दिमाख कधीच म्हणणार नाही. शरीर अवयवांत काय असते ते ठाऊक नाही पण ‘भावनात्मक ऐक्य निर्माण करण्यात आपण अपयशी ठरलो हे प्रामाणिकपणे मान्य केले पाहिजे’ असे मान्यवर धर्माधिकारी यांचे म्हणणे जोपर्यंत खर्या अर्थाने लक्षांत घेतले जात नाही तोपर्यंत ‘हे मोठे षडयन्त्र आहे’ ही भावनाच वाढत जाणार. बाकी ‘सबको सन्मति दे भगवान!’ एवढेच म्हणू शकतो.
प्रिय श्री० शां० भास्कर भट्ट यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपली विधाने व त्यांच्या मागील भावना पटतात, मनाला स्पर्श करतात. महाराष्ट्राच्या नेत्यांनी व जनतेनेही भाषिक, सांस्कृतिक व भावनिक प्रश्न फार गांभीर्याने, जिद्दीने सोडवायचा कधी प्रयत्न्च केलेला नाही असे वाटते. आपल्याला अधिक सविस्तर इतिहास माहित असावा.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट