हिंदी ही राष्ट्रभाषा? – एक गैरसमज आणि त्याचे मराठीवर अनिष्ट परिणाम

हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. परंतु भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी एका राष्ट्रभाषेची आवश्यकताही नाही. थरूरांनी मांडलेले मत हेसुद्धा पंडित नेहरूंनी भाष्य केलेल्या घटनेतील भाषाविषयक धोरणाच्या मूळ तत्त्वाशी पूर्णपणे सुसंगतच आहे. भारतात आपण जरी अनेक वेगवेगळ्या भाषा आणि असंख्य बोलीभाषा बोलत असलो तरी त्यामुळे आपल्या एकात्मतेला किंवा देशप्रेमाला बाधा येण्याचे काहीच कारण नाही. देशप्रेम व्यक्त करण्यासाठी देशात एकच अधिकृतपणे घोषित केलेली राष्ट्रभाषा असण्याची काहीच आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे मातृप्रेम ही अत्यंत प्राथमिक आणि मूलभूत भावना आहे आणि ती व्यक्त करण्यास कुठल्याही अधिकृत किंवा प्रमाणित भाषेची आवश्यकता नाही; त्याचप्रमाणे मातृभूमीबद्दलचे प्रेमही आपण आपापल्या मातृभाषेत व्यक्त करू शकतो, किंबहुना मातृभाषेतूनच भावना आणि संवेदना अधिक समर्थपणे व्यक्त करता येतात.